अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्याला इराणमध्ये मृत्यूची शिक्षा, वाचा सविस्तर बातमी

1033

इराणमधल्या सर्वोच्च न्यायालयाने मेहमूद मुसवी माजिद याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. माजिद याने अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांना गोपनीय माहिती पुरवली होती असं न्यायालयात सिद्ध झाल्याने त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने एका हल्ल्यात ठार मारले होते. त्यांच्याबाबतची माहिती माजिदने अमेरिका आणि इस्रायलला दिली होती असा त्याच्यावर आरोप होता.

3 जानेवारीला सुलेमानी यांना ठार मारण्यात आले होते. एका ड्रोनने त्यांच्या ताफ्यावर क्षेपणास्त्रे सोडण्यात आली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस आणि शक्तिशाली अल-कुद्स फोर्सचे जनरल ‘टॉप कमांडर’ कासिम सुलेमानी हे अमेरिकेने बगदाद येथे केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले होते. सुलेमानी यांच्या मृत्यूचे जगभरात पडसाद उमटत होते. अमेरिका आणि इराणमधील तणाव तेव्हापासून प्रचंड तणावाचे बनले आहेत. कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली होती. जनरल सुलेमानी यांचा ताफा इराकची राजधानी बगदाद विमानतळाबाहेर पडताच अमेरिकन हवाई दलाने ड्रोनमधून क्षेपणास्त्रे सोडली होती ज्यात जनरल सुलेमानी जागीच ठार झाले. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या इराण निमलष्करी दलाचे प्रमुख हाशीद-अल-शाबी यांचाही मृत्यू झाला होता. इतर सात जणही या हल्ल्यात ठार झाले होते.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्मायली यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात ते म्हणाले की न्यायालयाने माजिद याला अमेरिका आणि इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवला असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजिदनेच कासिम सुलेमानी यांची सगळी माहिती अमेरिका आणि इस्रायलला दिल्याचं न्यायालयात सिद्ध करण्यात आलं आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये आपला एकही सैनिक मारला गेला नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

लाल खड्यांच्या अंगठीमुळे ओळख पटली

कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या बोटावरील लाल खडय़ांच्या अंगठीवरून पटली. सुलेमानींच्या बोटामध्ये ही अंगठी नेहमी असायची. इराणचा पत्रकार स्टीवन नाबिलने सुलेमानी यांचे जुने फोटो ट्विट केले. त्यात या अंगठीवरून ओळख पटली आहे.

‘बाहुबली’ सुलेमानी यांना ठार का मारले?

  • इराणचे शक्तिशाली नेते आयातुल्लाह खोमेनी यांच्यानंतर दुसऱया क्रमांकाची शक्तिशाली व्यक्ती म्हणून 62 वर्षांचे कासिम सुलेमानी यांची इराणमध्ये ओळख होती.
  • इराणी नागरिकांचे ते हीरो होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे ते जनरल होते. तसेच इराणच्या अल-कद्स फोर्सची स्थापना त्यांनी केली होती.
  • इराणकडून पश्चिम आशियातील कोणत्याही मिशनची जबाबदारी सुलेमानी यांच्यावर होती. पश्चिम आशियाई देशांमध्ये सुलेमानी यांची एकप्रकारे दहशत होती.
  • 20व्या वर्षापासून ते इराण लष्करात होते.
  • जनरल सुलेमानी आणि अमेरिकेचे वैर जुने आहे. 1980च्या दशकात इराण आणि इराक युद्धात सुलेमानी यांनी महत्त्वाची मोहीम पार पाडली होती.
  • अमेरिकेने तेव्हा इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची साथ दिली होती. पुढे ते दोघे शत्रू झाले आणि अमेरिकेने सद्दाम हुसेन यांना ठार केले.
  • सुलेमानी यांनी इस्लामिक स्टेटसारख्या (इसिस) दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी कुर्द आणि शिया मिलिशिया यांची एकजूट केली. इसिसविरुद्ध त्यांनी जोरदार मोहीम उघडली.

इराण-इराक संबंधांमध्ये सुलेमानी यांना अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य नव्हता. आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या हितसंबंधांना ते बाधा पोहोचवत होते. इराकमध्ये अमेरिकन सैन्यावर हल्ल्याचाही आरोप सुलेमानी यांच्यावर होता. बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावरील हल्ल्यामागे सुलेमानी होते, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या विरोधाला भीक न घालता इराणमधील अण्वस्त्रां कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी सुलेमानी यांची महत्त्वाची भूमिका होती.

‘कुड्स’ सेना काय आहे?
कुड्स दल हे इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्सची एक तुकडी आहे. देशाबाहेरच्या मोहिमा आखणे आणि पूर्ण करणे याची जबाबदारी या दलाकडे सोपवण्यात आली होती. या दलाचा प्रमुख थेट आयतोल्लाह अली खोमेनी यांना उत्तरदायी होते. इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी हे या तुकडीचे प्रमुख होते.  2003 साली अमेरिकेच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट संपुष्टात आली होती. इथे निर्माण झालेल्या पोकळीमुळे अराजकता माजली होती. इराणच्या कुड्स दलाने याचा फायदा उचलत त्यांच्या कारवाया वाढवायला सुरुवात केली.

कुड्स दलाला इराणचे समर्थन करणाऱ्या अन्य देशातील विरोधी गटांनी शस्त्रास्त्रे, पैसे आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली होती. कुड्सने नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धनितीचे शिक्षण घेतले. त्यांनी स्वॉर्म तंत्र शिकून घेतले ज्यामध्ये बलाढ्य सैन्यासोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या जागांवरून हल्ला करण्याचे तंत्र सामील आहे. यशिवाय ड्रोन आणि सायबर हल्ल्यांचं तंत्रही या दलाने शिकून घेतलं आणि त्याचा विध्वंसक पद्धतीने वापर करायला सुरुवात केली.

अमेरिकेने या दलाला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.इतर देशाच्या सरकारशी निगडीत लष्करी तुकडीला दहशतवादी संघटना घोषित करण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती. इराणने याचा कडाडून विरोध करताना अमेरिकेवर टीका केली होती. आखाती भागात अमेरिकाच दहशतवादी संघटनेप्रमाणे वागत असल्याचं इराणने म्हटलं होतं. 2001 पासून 2006 दरम्यान इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ अनेकदा इराणच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांचं म्हणणं आहे की कासिम सुलेमानी याच्याकडे फक्त एक लष्कराचा कमांडर म्हणून पाहता येणार नाही. सुलेमानी हा ताकदीच्या जोरावर इराणसाठी परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या