हिंदुस्थानला झटका; इराणकडून तेल खरेदीस मनाई

31

सामना ऑनलाईन, मुंबई

इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे न थांबवल्यामुळे हिंदुस्थानसह आठ देशांवर अमेरिकेने आज निर्बंध लादले. इराणकडून हिंदुस्थानसह चीन, जपान, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, तैवान, इटली आणि ग्रीस हे आठ देश कच्च्या तेलाची आयात करतात. यात चीन आणि हिंदुस्थान हे इराणचे मोठे ग्राहक आहेत. अण्वस्त्र कार्यक्रम न थांबवल्यामुळे इराणवर अमेरिकेने निर्बंध लादले होते. तसेच इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी इराणकडून तेल आयात करू नये, असे आयातदार देशांना बजावले होते. मात्र, तेल एकदम आयात करणे थांबवता येत नसल्यामुळे 180 दिवसांची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ 2 मे रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

कच्च्या तेलावरील निर्बंधाच्या भीतीमुळे शेअर बाजार कोसळला

इराणकडून कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून निर्बंध घालण्याच्या भीतीमुळे मुंबई शेअर बाजारातील लहान गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. लहान गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर विक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 495 अंकांनी कोसळला. निफ्टीही 158 अंकांनी कोसळला. निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 74 डॉलरवर पोहोचली.  अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोपेओ हे 2 मे रोजी याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या