दुसरा दिवस गुजरातचा!

12

मुंबईः चिराग गांधीच्या १६९ धावांच्या धाडसी खेळीनंतर रणजी चॅम्पियन गुजरात क्रिकेट संघातील गोलंदाजांनी इराणी करंडकाच्या दुसऱया दिवशी आपली चमक दाखवल्यामुळे शेष हिंदुस्थानचा संघ बॅकफूटवर फेकला गेला आहे. गुजरातने पहिल्या डावात ३५८ धावा फटकावल्यानंतर शेष हिंदुस्थानने दुसऱया दिवसअखेरीस पहिल्या डावात ९ बाद २०६ धावा केल्या. आता त्यांचा संघ १५२ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार चेतेश्वर पुजाराने ८६ धावांची खेळी साकारत एकाकी झुंज दिली.

गुजरातने सकाळच्या सत्रात आठ बाद ३०० या धावसंख्येवरुन शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. पहिले शतक साजरे करणाऱया चिराग गांधीने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून रणजी चॅम्पियन संघाला ३५८ धावांपर्यंत नेले. चिराग गांधीने दोन षटकार व २२ चौकारांची बरसात करीत नाबाद १६९ धावा फटकावल्या. शेष हिंदुस्थानकडून सिद्धार्थ कौलने ८६ धावा देत पाच तर पंकज सिंगने १०४ धावा देत चार फलंदाजांना गारद केले.

शेष हिंदुस्थानच्या स्टार फलंदाजांना गुजरातच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला करता आला नाही. कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या ८६ धावा, मुंबईकर अखिल हेरवाडकरच्या ४८ धावा वगळता शेष हिंदुस्थानच्या नामवंत फलंदाजांना खेळपट्टीवर ठाण मांडून धावा काढता आल्या नाहीत. त्रिशतकवीर करुण नायर २८ धावांवर बाद झाला. चिंतन गजाने ४६ धावा देत तीन फलंदाजांना माघारी पाठवले. हार्दीक पटेलनेही तीन फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या