इराणी चषक : सदाबहार वासिम जाफरचे शतक आणि अश्विनचा लेगब्रेक

23

सामना ऑनलाईन । नागपूर

मुंबईकर वासिम जाफरने झळकावलेल्या ५३ व्या प्रथमश्रेणी शतकाच्या जोरावर इराणी चषक सामन्यातील पहिल्या दिवसअखेर विदर्भाने शेष हिंदुस्थानविरुद्ध २ बाद २८९ अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे. नागपूरच्या जामठा मैदानावर सुरु असलेल्या या लढतीमध्ये जाफरच्या शतकाबरोबरच अश्विनची लेगब्रेक गोलंदाजी हे देखील पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या वासिम जाफरने ४० व्या वर्षीही आपल्या बॅटमधील धावांचा ओघ आटलेला नसल्याचे दाखवून दिले. जाफर १६६ चेंडूत ११३ धावा काढून पहिल्या दिवसअखेर नाबाद आहे. १६ चौकार आणि युवा गोलंदाज जयंत यादवला खेचलेल्या एका षटकाराच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली आहे. जाफरला विदर्भाचा कर्णधार फैज फजलने ( नाबाद ८९ ) भक्कम साथ दिली.

अश्विनची लेगब्रेक गोलंदाजी

वासिम जाफर आणि फैज फजल या चिवट जोडीने नागपूरच्या उन्हाळ्यात शेष हिंदुस्थानी गोलंदाजांचे घामटे काढले.शेष हिंदुस्थानकडून खेळत असलेल्या आर. अश्विनने पहिल्या दिवशी निराशाच केली. रवींद्र जाडेजा अनफिट झाल्याने शेष हिंदुस्थानच्या संघात अश्विनचा शेवटच्या क्षणी समावेश झाला होता.

खेळपट्टीची कोणतीही साथ न मिळाल्याने जगभरातील दिग्गज फलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारा अश्विन पहिल्या दिवशी दिसलाच नाही. विकेट्स मिळवण्याचा दबाव वाढल्याने ऑफस्पिनर अश्विनने लेगब्रेक गोलंदाजीही केली. पण त्याला पहिल्या दिवशी केवळ एकच विकेट मिळवता आली.

आता गुरुवारचा दुसरा दिवस या सामन्यासाठी निर्णायक ठरणार आहे. रणजी करंडकाप्रमाणेच इराणी चषकही जिंकून इतिहास करण्यासाठी गुरुवारीही विदर्भाला चिवट फलंदाजी करावी लागणार आहे. तर शेष हिंदुस्थानच्या दिग्गज गोलंदाजांसमोर आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी विदर्भाला लवकरात लवकर ‘ऑल आऊट’ करावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या