एक जरी गोळी झाडली, तर अमेरिका जाळून टाकू; इराणची धमकी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. अमेरिकेने इराणला शुक्रवारी इशारा दिल्यानंतर शनिवारी इराणने थेट अमेरिकेलाच धमकी दिली आहे. एक जरी गोळी इराणच्या दिशेने झाडलीत तर अमेरिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतील. इराणवर गोळी झाडली तर अमेरिका जाळून टाकू अशी धमकी इराणने दिली आहे. अमेरिकेने कोणतीही आक्रमक कारवाई केल्यास अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर अबोफजल शकरची यांनी दिला आहे.

इराणवर लष्करी कारवाई केली असती तर अनेक सामन्य नागरिक मारले गले असते, त्यामुळे सैन्य करावाईचा निर्णय मागे घेतला असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इराणमध्ये तीन ठिकाणे हल्ले करण्याची अमेरिकेची योजना होती, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणला इशारा दिल्यानंतर शनिवारी इराणने थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. इराणने अमेरिकेचे सक्षम आणि अत्याधुनिक ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला असून युध्दाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणला युद्ध नको आहे, आम्ही कधीही युद्धाची भाषा केलेली नाही. मात्र, शत्रूने कोणतीही आगळीक केली तर आखाती देश, पश्चिम आशिया आणि इराणमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटतील. इराण कोणत्याही आक्रमक कारवाईला उत्तर देण्यास सक्षम असल्याचे शकरची यांनी सांगितले. शत्रूने एकही गोळी झाडली तर आम्ही त्याचे योग्य ते प्रत्युत्तर देऊ असे त्यांनी सांगितले. अमेरिकेने इराणबरोबरचा अणुसहकार्य करार रद्द करत त्यांच्यावर निर्बंध लादल्यानंतर दोन्ही देशातील संघर्ष वाढला होता. आता इराणने अमेरिकेचे सक्षम आणि अत्याधुनिक ड्रोन पाडल्यानंतर संघर्ष विकोपाला गेला होता. अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाईची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी ट्रम्प यांनी निर्णय मागे घेतला होता.