इराकच्या ‘ब्लू बेबी’ला मुंबईत मिळाले जीवदान, हृदयविकारावर यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मताच हृदयाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या इराकमधील एक महिन्याच्या बालकाला मुंबईत जीवदान मिळाले. शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया बिघडल्याने अंग निळसर पडणाऱया या बालकावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

एक महिना वयाच्या या बालकाला ‘डी-टीजीए’ (डेक्स्ट्रो-ट्रान्सपोझिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज) हा आजार जन्मतःच झाला होता. रुग्णालयातील बाल हृदयरोग चिकित्सा केंद्राचे संचालक डॉ. सुरेश राव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या पथकाने या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या हृदयातील दोष काढून टाकला. ‘डी-टीजीए’ या आजारामध्ये हृदयातून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱया महाधमनी आणि फुप्फुसीय धमनी या दोन मुख्य वाहिन्या त्यांच्या मूळ जागेवरून सरकून एकमेकांची जागा घेतात. हा दोष सुधारण्यासाठी धमन्या मूळ जागेवर बसविण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या बाळावर ती करावी लागली तसेच ‘एट्रियल सेप्टल डिफेक्ट’ (हृदयाला पडलेले छिद्र) हे बुजविण्यासाठीही शस्त्रक्रिया करावी लागली. यातून बाळ बरे झाले. रक्ताभिसरण बिघडल्याने अंग निळसर पडलेल्या आणि आता ते सुधारल्याने गुलाबी झालेल्या बाळाला घेऊन पुन्हा मायदेशी परतण्याची तयारी त्याचे पालक करू लागले आहेत.

‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल’चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘बाळाचे पालक मोठय़ा आशेने इराकमधून कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल झाले. आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या बाळावर उपचार करून त्याचा जीव वाचवला याबद्दल आम्हाला समाधान वाटते.’

आपली प्रतिक्रिया द्या