Tokyo Olympic विजयी होऊनही ‘हा’ बॉक्सर स्पर्धेतून बाहेर, जाणून घ्या नक्की काय घडलं

जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहेत. ही स्पर्धा हिंदुस्थानची बॉक्सर मेरी कोम हिच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त निर्णयासाठी क्रीडाप्रेमींच्या लक्षात राहील. तसेच आणखी एका बॉक्सरने केलेल्या प्रतापामुळेही लक्षात राहील. कारण हा बॉक्सर विजयी होऊनही स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.

त्याचे झाले असे की, आयर्लंडचा बॉक्सर अॅडेन वॉल्श आणि मॉरिशसच्या मर्वेन क्लेअर यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना रंगला. अॅडेन वॉल्श याने रोमहर्षक लढतीत मर्वेन क्लेअर याचा पराभव केला. या पराभवानंतर त्याने रिंगमध्ये उड्याच मारायला सुरुवात केली. अति आनंदात मारलेल्या उड्या अॅडेन वॉल्शला महागात पडल्या असून यामुळे त्याला दुखापत झाली.

रविवारी ब्रिटनच्या पॅट मॅकोरमॅक याच्याविरुद्ध अॅडेन वॉल्श याचा उपांत्यफेरीतील सामना होता. मात्र या लढतीपूर्वी तो मेडिकल चेकअपसाठी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे पॅट मॅकॉरमॅक याला विजयी घोषित करण्यात आले आणि तो फायनलला पोहोचला.

वॉल्श सुवर्णपदकाच्या रेसमधून बाहेर झाला असला तरी बॉक्सिंगच्या नियमांनुसार त्याला कांस्यपदक मिळेल. आनंदात मारलेल्या उड्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली असून आयर्लंडच्या बॉक्सिंग संघानेही यास दुजोरा दिला आहे. यामुळे तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याचे आयर्लंडच्या संघाकडून स्पष्ट करण्यात आले.

सतिश कुमार लढला, पण…

हिंदुस्थानचा बॉक्सर सतिश कुमार याचे ऑलिम्पिकमधील आव्हान रविवारी संपुष्टात आले. वर्ल्ड चॅम्पियन बखोदिर जालोलोव याच्याविरुद्ध त्याला 5-0 असा पराभव पत्करावा लागला. या लढतीपूर्वी सतिशला दुखापत झाली होती आणि सात टाकेही पडले होते. मात्र संकटांचा सामना करत सतिश रिंगमध्ये उतरला आणि जिद्दीने लढला.

आपली प्रतिक्रिया द्या