
उत्तर प्रदेशातील कन्नोजमधील एका महिलेच्या शेतात पाण्याची समस्या होती आणि त्याच समस्येला या महिलेनं आपली ताकद बनवली. किरण पुमारी राजपूत असे या महिलेचे नाव असून तिर्वा तालुक्यातील बधुइंया गावात राहतात. त्यांच्याकडे साधारण 23 बिघा जमीन आहे. त्यातील एका भागात महिलेनं चक्क एक लहानसे आयलँड तयार केले आहे. फक्त दहावी पास असलेल्या किरण पुमारी यांनी केलेला आविष्कार सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. अगदी गुगलने एक सन्मानपत्र देऊन या महिलेला गौरवले आहे.
किरण पुमारी यांनी सरकारी निधी, वाचवलेले पैसे, नातेवाईकांनी दिलेले पैसे एकत्र करून मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. तलावाच्या कामासाठी त्यांना एपूण 11 लाख रुपये खर्च आला. तलाव परिसरात एक बीघा जागेत आयलँड साकारलंय. त्यात आंबे, पेरू, केळी, पपई आणि काही फुलझाडं लावून बगीचा तयार केला आहे. पाण्याच्या मधोमध असलेले हे आयलँड बघण्यासाठी, त्याठिकाणी फिरण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. याशिवाय बोटिंगचाही आनंद घेतात.
लाखोंची बचत
किरण पुमारी राजपूत यांचा मुलगा शैलेंद्र राजपूत हे आयलँडची देखरेख करतात. तलावात नैन, चाइना फिश, सीलन, ग्रास कटर आणि सिल्वर हे मासे आहेत. फळ विक्री आणि मासेमारीतून 5 ते 7 लाखांची कमाई होत असल्याचे शैलेंद्र यांनी सांगितले.