जगलोच तर पत्नीसाठी जगाचंय, इरफान खान झाला भावूक

बॉलिवूड अभिनेता इरफान खान हा कर्करोगाशी लढा देत आहे. कर्करोगावर लंडनमध्ये उपचार घेऊन परतल्यानंतर इरफानने अंग्रेजी मीडियम हा चित्रपट देखील केला. येत्या 20 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र आजारपणामुळे इरफानला चित्रपटाचे प्रमोशन करता येत नाहीये. मात्र नुकतंच एका मुलाखतीत आजाराबाबत सांगताना इरफान भावूक झाला होता. त्याने त्याची पत्नी सुतापा खान हिच्या बाबत एक भावनिक वक्तव्य केलं आहे.

‘गेले काही दिवस हे फार चढ उताराचे होते. या दिवसात खूप काही घडून गेलं. हा चढ उतार आयुष्यातील एक असा काळ होता ज्यावेळी आम्ही दुखी कमी व जास्तीत जास्त खूष राहायचा प्रयत्न केला. मला या दरम्यान माझ्या मुलांसोबत वेळ घालवता आला. माझी पत्नी सुतापा ही 24 तास माझी काळजी घ्यायची. तिने खूप केलं या दिवसांत माझ्यासाठी. त्यामुळे आता जगलोच तर तिच्यासाठी जगायचंय. मी आता पर्यंत लढतोय याचं कारण तिच आहे’, असे इरफानने या मुलाखतीत सांगितले.

इरफान खान याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर हा कर्करोग आहे. यावर उपचार करून तो वर्षभरापूर्वी हिंदुस्थानात परतला होता. त्यानंतर त्याने हिंदी मीडियमचा सिक्वेल इंग्रजी मीडियम हा चित्रपट केला. 2017 साली ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये इरफानसोबत सबा करीम हिने काम केले होते. इरफानला न्यूरएंडोक्राइन टय़ुमर झाल्याचे निदान झाले असून त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारापूर्वी त्याने दोन प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. विशाल भारद्वाज दिग्दर्शित दीपिका पदुकोणसोबतचा सिनेमा तसेच गॉरमिंट ही वेबसीरिजही त्याने सोडली.

अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाच्या एक दिवस आधी इरफान खानने एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला होता. चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर रहावे लागल्याचे दु:ख इरफानच्या आवाजातून जाणवते. आजारपणामुळे आपल्याला प्रमोशन करता येत नसल्याचे इरफान सांगतो. ‘नमस्कार मित्रांनो, मी इरफान. मी तुमच्यासोबत आहे आणि नाही देखील. ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. खरं तर माझी मनापासून इच्छा होती की मी या चित्रपटाचे प्रमोशन करावे. परंतु माझ्या शरिरात काही ‘अनवाँटेड’ पाहुणे आहेत. त्यांच्यासोबच लढा सुरू आहे. पाहूया काय होतंय आणि याबाबत तुम्हाला नक्की कळवेन’, असे इरफान म्हणतो.

इरफान पुढे म्हणतो, ‘एक इंग्रजी म्हण आहे की, ‘When life gives you lemons, make lemonade’ (म्हणजे आयुष्यात जेव्हा संकटं येतात तेव्हा त्या संधीचा लाभ उठवावा). बोलताना चांगलं वाटतं, परंतु खरं तर आयुष्य ना आपल्या हातात लिंबू ठेवते न… तेव्हा सरबत बनवणे खुप अवघड होऊन जाते. परंतु तुमच्याकडे पॉझिटीव्ह राहण्यावाचून पर्याय तरी काय आहे? तुम्ही त्या परस्थितीत लिंबाचे सरबत बनवता अथवा नाही हे तुमच्यावर आहे. आम्ही सर्वांनी हा चित्रपट त्याच पॉझिटीव्हीटीने तयार केला आहे. मला आशा आहे हा चित्रपट तुम्हाला शिकवण देईल, तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल, डोळ्याच्या कडा ओल्या करतील आणि पुन्हा हसवेव. ट्रेलरचा आनंद घ्या आणि चित्रपट नक्की पाहा… आणि हो माझी वाट पहा.’

आपली प्रतिक्रिया द्या