एमटीएनएलच्या खंडीत इंटरनेटसेवेमुळे ग्राहक संतप्त

29

सामना प्रतिनिधी । उरण

वारंवार खंडीत होणाऱ्या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. मागील काही महिन्यांपासून तर दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागली आहे. वारंवार इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदी विभागातील हजारो ग्राहकांना बसलाआहे. एमटीएनएलच्या या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उरण तालुक्यातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा काही महिनाभरापासून वारंवार कोलमडू लागली आहे. खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. शासकीय कार्यालयालाही सातत्याने बंद पडणाऱ्या इंटरनेट सेवेचा फटका बसला आहे. त्याचे विपरित परिणाम विविध शासकीय कार्यालये, बॅंकांच्या कामकाजावरही होऊ लागले आहेत. त्याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिक आणि ग्राहकांना होत आहे. याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता उरण-जासई, बेलापूर, करळ ब्रिज,उरण शहर परिसरात सातत्याने रस्त्यासाठी खोदकामे सुरु आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांमुळे वारंवार ऑप्टीकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेटसेवा कोलमडत असल्याची माहीती एमटीएनएलचे उरण विभागाचे डीएम एल.आर.यादव यांनी दिली.

याबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना उरण एमएटीएनएलचे अधिकारी थातूर-मातूर उत्तरे देऊन वाटेला लावत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संतापाचा पारा अधिकच चढू लागला आहे. अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जाऊन इंटरनेट सेवाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या