ड्रायव्हरने खरंच वाचवले का यात्रेकरूंचे प्राण?

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरातील अनंतनाग जिह्यात बेटंगू येथे सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. यात ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. ज्या बसवर हा हल्ला झाला त्या बसचा ड्रायव्हर सलीम याने प्रसंगावधान राखत बस न थांबवल्यामुळे अनेकांचे जीव वाचले, असं समोर येत आहे. पण, पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घातपाताला अप्रत्यक्षपणे हा ड्रायव्हरही जबाबदार आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी असलेल्या सुरक्षेच्या नियमांचं उल्लघंन केल्यामुळे ही हानी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे.

‘हा हल्ला झाला तेव्हा बहुतांश यात्रेकरू झोपेत होते. गोळीबाराचा आवाज येताच त्यांना आधी फटाके फुटल्यासारखं वाटलं. पण, काही सेकंदांनंतर त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. पण तोपर्यंत मी बसचा वेग वाढवला होता’, असं सलीम याचं म्हणणं आहे. बसचा वेग वाढवून सलीमने बस पुढे नेली आणि सुरक्षित ठिकाणी थांबवली. त्यामुळे अनेक यात्रेकरूंचे प्राण वाचले, असं वृत्त समोर येत आहे.

मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार या बसच्या ड्रायव्हरने नियमांचं उल्लंघन केलं होतं. या बसचं कोणतंही रजिस्ट्रेशन अमरनाथ श्राइन बोर्डाकडे नव्हतं. शिवाय सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे ही गंभीर घटना घडल्याचं पोलिसांची म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या