प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार?

priyanka-gandhi-up

सामना ऑनलाईन । लखनौ

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या 2022 ला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी एक बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर देखील चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीनंतर ज्योतिरादित्य सिधिंया यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील मुद्द्याविषयी सांगितले. यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत का याबाबत विचारले असता सिंधिया यांनी हा निर्णय पार्टी हाय कमांड घेईल असे सांगितले. या बैठकित उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची झालेली पिछेहाट कशी थांबवायची याबाबत चर्चा झाली. मात्र या बैठकीला उत्तर प्रदेशमधील अनेक नेते गैरहजर होते.

या आठवड्यात प्रियंका गांधी यांनी रायबरेलीत बैठक घेतली होती. त्यावेळी देखील प्रियंका गांधीच उत्तरप्रदेशच्या पुढच्या मुख्यमंत्री असतील अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.