कसोटी मालिकेसाठी इशांत खेळण्याची शक्यता; फिटनेस चाचणीत यशस्वी

762

किवीजविरुद्धच्या वन डे मालिकेतील हिंदुस्थानी गोलंदाजी सुपरफ्लॉप ठरली होती. त्यामुळे संघाला या मालिकेत व्हाईट वॉशची नामुष्कीची पत्करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी खुशखबर आहे. हिंदुस्थानी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून तो संघाकडून कसोटी मालिका खेळू शकणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इशांतची संघात निवड झाली होती. मात्र, त्याचे संघात खेळणे हे फिटनेस टेस्टवर अवलंबून होते. शेवटी बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये इशांतने सर्व निकष पूर्ण करत आपले कसोटी संघातले स्थान पक्के केले आहे. त्याच्या समावेशाने हिंदुस्थानी गोलंदाजीची ताकद वाढणार आहे.

बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही वृत्तसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 21 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान – न्यूझीलंड संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना इशांतच्या पायाला दुखापत झाली होती. इशांतनेही ट्विट करत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फिजीओंचे आभार मानले आहेत. इशांत शर्माला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये संघातील आपले स्थान कायम राखता आलेले नसले तरीही कसोटी संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचे स्थान अव्वल राखण्यात इशांतनेही महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत इशांत कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या