‘आयपीएल’मध्ये डावलले; काऊंटीमध्ये करून दाखवले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात कोणत्याच संघाने घेण्यात रस दाखविला नाही. त्यामुळे इशांतला नाइलाजाने इंग्लिश काऊंटी क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवावा लागला. मात्र हिंदुस्थानच्या या वेगवान गोलंदाजाने काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच पाच बळी टिपण्याचा पराक्रम केला. इशांत शर्माने ससेक्स संघाकडून खेळताना वॉर्विकशायर संघाविरुद्ध खेळताना पाच फलंदाज बाद केले. तो काऊंटी सिझनमध्ये दोन महिने खेळणार असून काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने, तर एकदिवसीय चषक स्पर्धेत सहा गट सामने खेळणार आहे. ‘टीम इंडिया’ला या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा आहे. इंग्लंड दौऱयाच्या पार्श्वभूमीवर काऊंटी क्रिकेटमधील चांगली कामगिरी इशांत शर्मासाठी ‘टीम इंडिया’च्या निवडीसाठी फायदेशीर ठरू शकते.