
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एका एजंटची नेपाळमध्ये त्याच्या घराबाहेर हत्या करण्यात आली आहे. या एजंटमार्फत पाकिस्तान आणि बांगलादेशातून बनावट नोटा हिंदुस्थानात पाठवल्या जात असत. लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी 55 असे या एजंटचे नाव आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून लाल मोहम्मद पाकिस्तान आणि बांगलादेशातून बनावट हिंदुस्थानी चलन नेपाळमध्ये आणायचा आणि तेथून ते हिंदुस्थानात पाठवायचा.
या एजंटची हत्या कोणी आणि का केली हे कळू शकलेले नाही. मात्र, हत्येची संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये अज्ञात हल्लेखोर काठमांडूच्या गोथर भागात त्याच्या घराबाहेर कारमधून खाली उतरून पाकिस्तानी एजंटला गोळ्या घालताना दिसत आहेत. मारले गेलेल्या एजंटचे डी कंपनीशी संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. पाकिस्तान अनेक दिवसांपासून नेपाळचा हिंदुस्थान विरुद्ध लॉन्च पॅड म्हणून वापर करत आहे.
गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, लाल मोहम्मदने आयएसआयला लॉजिस्टिक सपोर्टमध्ये मदत केली होती आणि अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचे डी-गँगशी संबंध होते. त्याने इतर आयएसआय एजंटनाही आश्रय दिला होता. आयएसआयचा नेपाळमध्ये सातत्याने शिरकाव होत आहे. नेपाळमध्ये हिंदुस्थानपेक्षा जास्त सुरक्षा मिळते आणि दहशतवादी कारवाया करणे सोपे आहे. त्यामुळे नेपाळ गेल्या काही दशकांपासून आयएसआयच्या दहशतवाद्यांचा गड बनला आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्करातील एक निवृत्त अधिकारी नेपाळमधूनच बेपत्ता झाला होता. त्यानंतर यामागे हिंदुस्थानी गुप्तचर संस्था असल्याचा संशय पाकिस्तानने व्यक्त केला होता.