कंदहार अपहरणामागे आय.एस.आयचा हात होता-अजित डोवाल

43

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

१९९९ साली इंडीयन एअरलाईन्सच्या कंदहार विमान अपहरण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात होता असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला आहे. रॉयटरच्या माजी ब्यूरो चीफ मायरा मॅकडोनाल्ड यांनी ‘डिफीट इज अॅन ऑर्फन, हाऊ पाकिस्तान लॉस्ट द ग्रेट साऊथ एशियन वॉर’ नावाचे पुस्तक लिहले आहे. यात त्यांनी डोवाल यांच्या कामगिरीचा उल्लेख केला असून त्यांची विधानेही प्रसिध्द केली आहेत.

काठमांडूहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडीयाच्या  IC-८१४ या विमानाचे तालिबान्यांनी अपहरण केले होते. अपहरणकर्त्यानी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार विमानतळावर उतरवले होते. यावेळी अपहरणकर्त्यांशी प्रवाशांच्या सुटकेची बोलणी करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने एक विशेष पथक नेमले होते. यात डोवाल यांचाही समावेश होता.या कामगिरीबददल डोवाल यांनी त्यांचे अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत.

ज्यावेळी हे पथक कंदाहार विमानतळावर पोहचले तेव्हा अपहरण करण्यात आलेल्या विमानाला तालिबान्यांनी वेढा घातल्याच त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर काहीवेळातच आयएसआयचे अधिकारी तेथे आले व तालिबान्यांशी बोलू लागले. यावरुन या अपहरणनाट्यात आयएसआय सामील असल्याचे स्पष्ट झाल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे. यामुळेच अपहरणकर्त्यांवर दबाव आणण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न कमी पडला.

अपहरण केलेल्या विमानातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात मसूद अजहर,अहमद उमर सईद शेख, आणि मुस्ताक जरगार या दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी तालिबान्यांनी हिंदुस्थान सरकारकडे केली होती.या तिघांना सोडण्यात आल्यावरच अपहरणकर्त्यानी प्रवाशांची सुटका केल्याचे डोवाल यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या