मालवणीतील दोघा ‘इसिस’ समर्थकांना आठ वर्षे तुरुंगवास, एनआयए कोर्टाचा निकाल

मालाड-मालवणी परिसरातील चार मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) मार्ग दाखवणाऱ्या दोघा इसिस समर्थकांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने आठ वर्षे तुरुंगवास आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. रिजवान अहमद (32) आणि मोहसीन इब्राहीम सय्यद (25) अशी दोषींची नावे आहेत.

विशेष न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. न्यायालयाने यूएपीए कायद्याच्या कलम 20 अन्वये रिजवान आणि मोहसीन या दोघांना गुरुवारी दोषी ठरवले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षा सुनावली. या दोघांनी मालाड-मालवणी परिसरातील चार मुस्लिम तरुणांना ‘इसिस’मध्ये भरती करण्यासाठी त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला. गरीब तरुणांना परदेशात नेले. तेथे त्यांना हिंदुस्थान व हिंदुस्थानच्या मित्रराष्ट्रांविरुद्ध युद्ध छेडण्याच्या हेतूने दहशतवादी संघटनांचे सदस्य बनण्यासाठी भडकवले, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयापुढे सबळ पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले. रिजवान व मोहसीनने गरीब तरुणांना भडकवले, धमकावले आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केले, असा आरोप एनआयएने केला होता.

पाच वर्षे चालला खटला

रिजवान व मोहसीनविरुद्ध सुरुवातीला 12 डिसेंबर 2015 रोजी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मार्च 2016 मध्ये एनआयएने नवा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणात एनआयएने 18 जुलै 2016 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. मागील पाच वर्षे या गुह्याचा खटला चालला. दोषींनी गेल्या महिन्यात न्यायालयापुढे अर्ज करीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ ठरला.