पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांना हॉटेलमधून हाकलले

1150

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. शनिवारीही कराची येथील एका हॉटेलमध्ये हिंदू महिलांना जेवण देण्यास नकार देत मालकाने हाकलून लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हॉटेल मालकाला झापले. त्यानंतर त्याने महिलांची जाहीर माफी मागितली व त्यांचा शालजोडी देऊन सत्कारही केला.

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील लरकाना क्षेत्रात कराची राष्ट्रीय मार्गावर अल हबीबी नावाचे एक हॉटेल आहे. शनिवारी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) काही महिला सदस्य लरकाना येथे जात होत्या. यादरम्यान, दुपारच्या जेवणासाठी त्या अल हबीबी हॉटेलमध्ये गेल्या. पण महिलांचे पेहराव व भाषा बघून त्या हिंदू असल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल मालकाने त्यांना जेवण देण्यास नकार दिला. महिलांनी कारण विचारताच त्याने त्यांना शिवीगाळ करत हॉटेलबाहेर हाकलून काढले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कराचीत सिंधी समाचारमध्ये याबद्दल वृत्त येताच हॉटेल मालकावर अनेकांनी सडकून टीका केली. येथील हिंदू समुदायाने अल हबीबीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे हॉटेलला आर्थिक फटक्याबरोबरच लोकांचा रोष सहन करावा लागेल या भितीने हॉटेल मालकाने महिलांची जाहीर माफी मागितली व त्यांना शाल देऊन सत्कार करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

आपली प्रतिक्रिया द्या