इस्रायलचा हिंदुस्थानला मैत्रीचा संदेश; ‘तेरे जैसा यार कहाँ’ या धूनने व्यक्त केल्या भावना

1291

इस्त्रायल आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांची मैत्री जुनीच आहे. ही मैत्री कठीण प्रसंगात नेहमी दिसून येत असते. रविवारी जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने या दोन देशातील मैत्री पुन्हा दिसून आली आहे. इस्त्रायलने हिंदुस्थानला मैत्रीचा संदेश पाठवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इस्त्रायलच्या दूतावासाच्या ट्विटर हँडलवरून दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध याराना चित्रपटातील ‘तेरे जैसा यार कहाँ’ या प्रसिद्ध गीताच्या धूनवरील व्हिडिओवर पाठवण्यात आले आहेत. या व्हडिओतून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दृढ मैत्रीही दिसून येत आहे.

जागतिक मैत्री दिनानिमित्त इस्त्रायलने ‘तेरे जैसा यार कहाँ’ या गाण्याच्या धूनचा वापर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इस्त्रायलने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीची झलक आहे. त्यातून दोन्ही देशातील मैत्री दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या जागतिक संकटाशी एकत्रित मुकाबला करण्याचा संकल्पही या व्हिडिओत दिसत आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमधील दृढ मैत्रीही दिसून येत आहे.

ही दोस्ती तुटायची नाय…
नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील दृढ मैत्री जगजाहीर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौर्‍यावेळी नेतान्याहू प्रोटोकॉल तोडत मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचले होते. इस्रायलमध्ये असे स्वागत याआधी फक्त अमेरिकेचे अध्यक्ष आणि पोप यांचे करण्यात आले होते. नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत इस्त्रायल नेहमी हिंदुस्थानसोबत आहे. इस्रायल आणि हिंदुस्थानने कोरोना जागतिक संकटाविरोधात एकत्रित लढण्याचा संकल्प केला आहे. हिंदुस्थानने इस्रायलला हायड्रोक्लोरोक्विन पाठवले, तेव्हा नेतान्याहू यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. रविवारच्या मैत्री दिनानिमित्ताने इस्त्रायलने या गाण्याची धून पाठवत मैत्रींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या