
इस्रायल आणि हमासचे युद्ध सुरू होऊन महिना उलटला तरी संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीय. या युद्धात आतापर्यंत 11 हजार 470 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले असून 2700 हून अधिकजण बेपत्ता आहेत. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सर्वाधिक लोक मारले गेले आहेत. या मृतांमध्ये 4 हजार 707 अल्पवयीन आणि 3 हजार 155 महिला आहेत. दरम्यान, इस्रायलच्या सैनिकांनी पॅलेस्टाईनच्या नागरिकांना दक्षिण गाझातून पळून जाण्याचा इशारा देणारी पत्रके टाकली आहेत. त्यामुळे इस्रायल आता दक्षिण गाझामध्येही मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इस्रायली सैनिकांनी बुधवारी पहाटे उत्तरेकडील शिफा हॉस्पिटलची झडती घेतली. इस्रायली लष्कर IDF ने दावा केला आहे की, अल शिफा रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात असले तरी त्याखाली हमासचे एक मोठे कमांड सेंटर सुरू आहे, जे शहराच्या सर्व बोगद्यांशी जोडलेले आहे. रुग्णालयात रुग्ण, डॉक्टर व अटेंडंट नसल्याचेही समोर आले आहे. सर्व जखमींना एक दिवसापूर्वीच जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शिफा हॉस्पिटलचा वापर हमासद्वारे त्याच्या लष्करी ऑपरेशनसाठी केला जात आहे. हमासने इस्रायलच्या या आरोपांचे खंडन केले आहे.
7 ऑक्टोबरपासून लढाई सुरू आहे-
गाझामध्ये 1.5 दशलक्षाहून अधिक लोक अंतर्गतरित्या विस्थापित झाले आहेत, त्यापैकी बहुतेक दक्षिणेकडे पळून गेले आहेत. या भागात अन्न, पाणी आणि विजेची टंचाई वाढत असून लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झाले होते, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी 1200 हून अधिक लोकांची हत्या केली होती.