हुथी बंडखोरांनी हिंदुस्थानात येणारे जहाज केले हायजॅक, 25 क्रू मेंबर्स बेपत्ता

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आता जहाजाचा मार्ग धोक्यात आला आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल सागरातून हिंदुस्थानात येणारे मालवाहू जहाज हायजॅक केले आहे. जे कथितरित्या इस्रायलचे आहे. या जहाजावर 25 क्रू मेंबर्स होते, त्यामध्ये युक्रेन, बुल्गारिया, फिलिपिन्स आणि मॅक्सिकोचे लोक आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने जहाज हायजॅकप्रकरणी तेहरान सरकारला जबाबदार धरले आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. हे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. हिजबुल्लाह, हमासनंतर आता हुथी बंडखोरांनी यात उडी घेतली आहे.  हुथी बंडखोरांनी येमेनच्या लाल समुद्रातून एक जहाज हायजॅक केले. इस्रायलच्या सरकारने रविवारी सांगितले की, येमेनमध्ये ईराण समर्थित हुथी बंडखोरांनी एक मालवाहू जहाज हायजॅक केले आहे. यावर 25 क्रू मेंबर्स होते, त्यामध्ये युक्रेन, बुल्गारिया, फिलिपिन्स आणि मॅक्सिकोच्या लोकांचा समावेश आहे. तर बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने कोणाचे नाव न घेता याबाबत निषेध व्यक्त करत सांगितले की, हे जहाज एका ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे होते आणि ती जपानी कंपनी आहे. जहाजाच्या 25 क्रू मेंबर्सपैकी एकही इस्रायली नव्हता.

येमेनच्या हुथी बंडखोरांनी रविवारी इस्रायली जहाजांना धमकी दिली होती आणि काही तासानंतरच जहाज हायजॅक करण्यात आले. इस्रायली ध्वज घेऊन जाणाऱ्या जहाजांबरोबर इस्रायली जहाज कंपन्यांवर निशाणा साधणार आहेत. हुथी प्रवक्त्याने एक्सवर पोस्ट करत इस्रायली जहाजांवर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांना परत बोलवण्याचे आवाहन केले होते. इस्त्रायली संरक्षण दलाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘दक्षिण लाल समुद्रात येमेनजवळ हुथींनी एक मालवाहू जहाज हायजॅक करणे ही जागतिक पातळीवरील अत्यंत गंभीर घटना आहे. या जहाजावर एकही इस्रायली नाही. हे जहाज तुर्कस्तानहून आंतरराष्ट्रीय नागरी कर्मचाऱ्यांसह हिंदुस्थानसाठी रवाना झाले होते. रिपोर्टनुसार, या जहाजाचे नाव गॅलेक्सी लीडर आहे.

हुथी बंडखोर येमेनमध्ये आहे, ज्यामुळे ते लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर हल्ला करू शकतात. जानेवारी 2022 मध्ये, हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील रुग्णालयासाठी पुरवठा करणारे यूएई-ध्वज असलेले मालवाहू जहाज हायजॅक केले होते. हुथींना इराणकडून प्रशिक्षण, तांत्रिक माहिती आणि अत्याधुनिक शस्त्रे मिळत असल्याचे मानले जाते. यामध्ये ड्रोन, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने रविवारच्या हल्ल्यासाठी तेहरान सरकारला जबाबदार धरले आहे.