Israel-Iran War: इस्त्रायल-इराणमध्ये युद्ध झाल्यास हिंदुस्थानावरही होणार मोठा परिणाम, वाचा सविस्तर…

इस्त्रायल आणि इराणमध्ये अनेक वर्षांपासून तणाव सुरू आहे. हा तणाव आता वाढत चालला असून कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्याचा परिणाम ग्लोबल मार्केटसह हिंदुस्थानवरही होऊ शकतो. युद्धाच्या प्रभावाने पेट्रोल-डिझेल, सोने-चांदी, गॅस सिलिंडरसह अनेक गोष्टींच्या किंमती वाढू शकतात.

पेट्रोल-डिझेल, पेट्रोलिअम उत्पादने

इराण जगातल्या सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या उत्पादकांपैकी एक देश आहे. हा देश पश्चिम आशियाच्या संवेदनशील परिसरात आहेत. तेल बाजारांमधील अस्थिरतेने कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील. ज्यामुळे पेट्रोल, डीझेल आणि अन्य पेट्रोलिअम उत्पादने महाग होतील. त्याचा हिंदुस्थानावर विशेष रुपाने प्रभाव पडेल. तेलाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या हिंदुस्थानावर याचा मोठा परिणाम होईल.

सोने -चांदी

युद्धाच्यावेळी गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीवर मोर्चा वळवतात. त्यामुळे सोने-चांदीच्या मागणीत वाढ होते आणि किमती गगनाला भिडतात. हिंदुस्थानात सोन्याची मागणी आधीपासूनच अधिक आहे. यावर युद्धाचा परिणाम दिसून येईल.

गॅस सिलेंडर आणि वीज 

इराण नैसर्गिक वायूच्या वाढत्या उत्पादकांपैकी एक आहे. युद्ध परिस्थितीत इराणच्या गॅस निर्यातीवर प्रभाव पडू शकतो. ज्यामुळे युरोप आणि आशियामध्ये उर्जा संकट उद्भवू शकते. हिंदुस्थानातही नैसर्गिक वायूच्या किंमती वाढू शकतात, ज्याचा सरळ परिणाम थेट घरगुती गॅस, सिलिंडर आणि ऊर्जा उत्पादनावर होऊ शकतो.

खाद्यपदार्थ

इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा जागतिक शिपिंग मार्गांवर, विशेषत: होर्मुजच्या सामुद्रधुनीवर परिणाम होऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात अन्न आणि कृषी उत्पादनांचा व्यापार केला जातो. या प्रदेशातील शिपिंग विस्कळीत झाल्यास जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल आणि गहू, साखर आणि इतर कृषी उत्पादनांसारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढू शकतात. हिंदुस्थानातील या महागाईचा थेट परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतो.

औषध उद्योग

इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा अप्रत्यक्ष प्रभाव फार्मास्युटिकल उद्योगावर पडू शकतो. हिंदुस्थान औषधांसाठी कच्च्या मालाचा मोठा भाग विदेशातून आयात करतो. अशामध्ये औषधांच्या किंमतींमध्ये वाढ संभव आहे. याचा थेट परिणाम सामान्यांवर होणार आहे.