दिल्लीतील ‘या’ घडामोडीकडे दुर्लक्ष करता येणार नाही!

4894
k-sivan-ajit-doval

दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच सामना रंगणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र अशातच एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एनएसए अजित डोवाल आणि इस्रोचे अध्यक्ष के सिवन हे दोघेही एकाच वेळी संसदेत उपस्थित होते. त्यांनी संसदेत हजेरी लावली त्यावेळचे फोटो आणि माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केली आहे.

जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर एनएसए अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची आहे. तर के सिवन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. 25 नोव्हेंबर रोजी कार्टोसॅट-3 लाँच करणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात दोन आणखी सर्व्हिलंस सॅटेलाइट्स रीसॅट-2बीआर1 आणि रीसॅट-2बीआर2 प्रक्षेपित करणार आहे. ही कृत्रिम उपग्रह हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळेच अजित डोवाल आणि के सिवन यांचे आज संसदेत उपस्थित राहणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जात आहे.

जम्मू-कश्मीरमधून 370 हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी हिंदुस्थानमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत असे घातपात रोखण्यासाठी किंवा त्यांचे डाव उधळून लावण्यात हिंदुस्थानच्या सुरक्षा यंत्रणेला यश आले असून इस्रोची यामध्ये प्रमुख भूमिका राहिली आहे. ‘उरी’ हल्ल्यानंतर देखील दहशतवाद्यांचे तळ शोधण्यासाठी, तिथले फोटो आणि माहिती आवश्यक होती. इस्रोच्या मदतीने ती माहिती मिळवून सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यात आला होता.

कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट सिरिज मधील नववा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कॅमेरा इतका शक्तीशाली आहे की अंतराळातून जमिनीपासून 1 फूटापेक्षाही कमी उंचीवर असलेल्या वस्तुचा फोटो घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातावर बांधलेल्या घड्याळाचा देखील फोटो आणि त्याच्याशी निगडीत माहिती मिळवू शकतो. तसेच पृथ्वीवरील हवामान, त्यात होणारे बदल याची माहिती देखील या उपग्रहाच्या मदतीने मिळवता येणं शक्य आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, दहशतवादी कारवाया हे पाहता सुरक्षेच्या दृष्टीने हिंदुस्थान सर्व बाजूंनी दक्षता घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा आणखी तगडी करण्यात येत आहे. त्यामुळेच संसदेच्या प्रांगणात एनएसए अजित डोवाल आणि इस्रोचे प्रमुख के सिवन हे एकाच दिवशी उपस्थित राहणं हे उत्सुकता वाढवणारं ठरतं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या