अवकाशात हिंदुस्थानची ऐतिहासिक शतकभरारी, १०० उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

32

सामना ऑनलाईन । श्रीहरिकोटा

हिंदुस्थानची अवकाश संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी उपग्रहांची शतकी झेप घेतली. पीएसलव्ही-सी४० या अंतराळयानाच्या माध्यमातून अवकाशात ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. हे प्रक्षेपण सकाळी ९.२८ वाजता सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा इथून करण्यात आलं.

इस्रोनेच या मोहिमेची माहिती गुरुवारी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली होती. ‘पीएसलव्ही-सी४०’ या अंतराळयानाची उंची ४४. ४ मीटर असून वजन ३२० टन इतकं आहे. या अंतराळयानासोबत सुमारे १३३२ किलो वजनाचे ३१ उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या उपग्रहांपैकी तीन उपग्रह हिंदुस्थानचे आहेत तर उर्वरित उपग्रह कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, इंग्लंड आणि अमेरिकेचे आहेत. हे उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हिंदुस्थानने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांची संख्या १०० झाली आहे. अवकाशात फिरताना पृथ्वीच्या वरच्या कक्षेत राहून ते पृथ्वीचं निरीक्षण करणार आहेत.

दरम्यान, हिंदुस्थानच्या या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्थान या प्रक्षेपणाच्या माध्यमातून दुटप्पी भूमिका घेत आहे. तंत्रज्ञान प्रगतीच्या आडून हिंदुस्थान परकीय देशांचे नागरिक आणि त्यांचं सैन्य यावरही लक्ष ठेवू शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर जर चुकीचा होत असेल, तर त्याने परराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होतील’, असे फुत्कार पाकिस्तानने सोडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या