
हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्त्रोने रविवारी अवकाशात रामनवमीआधीच हनुमानझेप घेतली आहे. ISRO LVM3 रॉकेटने अवकाशात सहाव्यांदा उड्डाण केले असून एकाचवेळी 36 विदेशी उपग्रह अंतराळात सोडून इतिहास रचला आहे. रॉकेटचे एकूण वजन 5805 किलो आहे. या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी इस्त्रोने तब्बल एक हजार कोटी रूपये घेतले आहेत.
ISRO LVM3 ने रविवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून देशातील सर्वात मोठे रॉकेट लॉन्च केले. वनवेब ही ब्रिटनची कंपनी आहे. यामध्ये ब्रिटन सरकार आणि हिंदुस्थान, फ्रान्स, जपान. अमेरीका आणि दक्षिण कोरिया कंपंन्यांच्या भागीदारी आहेत. ही कंपनी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवते. हिंदुस्थानी कंपनी भारती एंटरप्रायझेसची वनवेबमध्येही भागीदारी आहे. वनवेबद्वारे पृथ्वीच्या चारही बाजूने 648 उपग्रहांना स्थापित करण्यात आले आहे. त्यांना जवळपास 1200 किमी उंच कक्षेत स्थापित करण्यात आले आहे. आज 36 उपग्रहांना अंतराळात सोडण्यात आल्यानंतर 648 उपग्रह स्थापित केले आहेत. एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून प्रत्येक विमानामध्ये 4 किमी अंतर होते.
वनवेबच्या सर्व 648 उपग्रहांना स्थापित केल्यानंतर कंपनी जगभरात कुठेही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देता येईल. उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये (पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत) ठेवलेले आहेत. उपग्रहांना स्थापित करण्यासाठी वनवेब आणि इस्रोची व्यावसायिक कंपनी NSIL (न्यूज स्पेस इंडिया लिमीटेड) यांच्यात करार करण्यात आला होता. या अंतर्गत 72 उपग्रह लॉन्च केले जाणार होते. इस्रोने यापूर्वी 36 उपग्रह लॉन्च केले होते. उर्वरित 36 उपग्रह आज रविवारी अवकाशात पाठवण्यात आले.
ISRO ने LVM-3 वापरून 5805 किलो वजनाचे 36 पेलोड अंतराळात पाठवले. हे इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. त्याची लांबी 43.5 मीटर आहे. हे मुळात GSLV Mk-3 (Geosynchronous Launch Vehicle Mark-3) आहे. चांद्रयान मोहिमेत इस्रोने त्याचा वापर केला होता. जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये उपग्रह ठेवण्यासाठी या रॉकेटची रचना करण्यात आली आहे. लॉ अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह पाठवण्यासाठी त्याला LVM-3 असे नाव देण्यात आले.