जालन्यातील आयकर विभागाच्या धाडीत 58 कोटी कॅशसह 32 किलो सोने जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त

जालन्यात आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिक, व्यापारी, व्यावसायिकावर आयकर विभागाने धाड टाकून 390 कोटींची मालमत्ता जप्त केली. धाडीत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मोजण्यासाठी मशीनचा वापर करावा लागला. 12 मशीनच्या सहाय्याने 14 तास नोटा मोजण्यासाठी लागले.

आयकर विभागाच्या छाप्यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशीन रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘राहुल वेड्स संजय’ अशा स्वरुपाचे स्टीकरही गाड्यावर लावण्यात आले होते.

आयकर विभागाने मारलेल्या छापमारीमध्ये सुरुवातील कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र त्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसवर छापा टाकला. तिथे तपास केला. या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यांमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आली. अडगळीमधील काही पिशव्यांमध्येसुद्धा रोकड सापडली. मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते. तर दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातच अशाचप्रकारे रोख रक्कम आढळून आली.

इनकम टॅक्स विभागाने जालन्यातील चार मोठ्या स्टील व्यावसायिकांवर छापा टाकला. संभाजीनगर पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

1 ऑगस्टला टाकण्यात आलेल्या या छापेमारीबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. 8 ऑगस्टपर्यंत आयकराचे अधिकारी तपास करत होते. नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकूण अडीचशेपेक्षा जास्त अधिकारी 120 हून अधिक वाहनांमधून जालन्यात धडक दिली होती. जालन्यात आढळून आलेली रोख रक्कम स्थानिक स्टेट बँकेत नेण्यात आली. तिथे सकाळी 11 वाजता या रोख रकमेची मोजणी सुरु करण्यात आली होती.