आर्थिक अफरातफर प्रकरणातील आरोपीने वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या अर्जाला विरोध करणाऱया ईडीला विशेष पीएमएलए न्यायालयाने चपराक लगावली. आरोग्य बहुमोल आहे. आपल्या मर्जीनुसार उपचार घेणे हा आरोपीचा (कच्च्या पैद्याचा) मूलभूत हक्कच आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने टॉपवर्थ ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक अभय लोढा याला दिलासा दिला.
विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी लोढाला त्याच्या मर्जीनुसार लीलावती वा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यास परवानगी दिली. त्याला यापूर्वी क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास मुभा दिली होती. तेथे तब्येत खालावल्यानंतर आणखी वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांनी त्याला लीलावती वा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्याअनुषंगाने लोढाने अर्ज केला होता. त्यावर ईडीने आक्षेप घेतला आणि अर्ज फेटाळण्याची विनंती केली.
आरोपीच्या तब्येतीची जबाबदारी घेणार का?
आरोपीच्या अर्जाला विरोध करणाऱया ईडीला न्यायालयाने फटकारले. क्रिटी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या सुचवल्या आहेत. त्या चाचण्या न करताच आरोपीला आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले, तर आरोपीच्या तब्येतीची जबाबदारी ईडी किंवा तुरुंग प्रशासन घेणार का, असा सवाल न्यायालयाने केला.