एटीएममध्ये तीन महिन्यानंतर मिळणार २००ची नोट?

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर २००ची नोट आणली होती. मात्र एक आठवड्यानंतरही ही नोट अनेकांना फक्त फोटोमध्येच पाहायला मिळत आहे. बँकेमध्येही अनेक ठिकाणी या नोटा जमा नसल्याचे समोर आले आहे. अशात एटीएममध्ये २००ची नोट दाखल होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नव्या कोऱ्या २००च्या नोटेसाठी एटीएममध्ये काही बदल करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. काही बँकांनी आपल्या एटीएम मशीन कंपनीकडे टेस्टींगसाठी दिल्या आहेत. मात्र नवीन नोटांची खेप न पोहोचल्याने हे काम रखडले आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटांसाठी एटीएममध्ये बदल करण्यात आला होता.

एटीएम तयार करणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून नवीन नोटेसाठी एटीएममध्ये बदल करण्याबाबत कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. बँकेने सुचना दिल्यानंतरच एटीएममध्ये बदल करण्यात येईल. २००च्या नोटांची रचना वेगळी असल्याने जवळजवळ २.२५ लाख एटीएममध्ये बदल करावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या