काम न करता 15 वर्ष पगार मिळाला… खात्यात जमा झाले एवढे कोटी

काम करूनही बऱ्याचदा लोकांना पगार मिळत नाही हे सत्य आहे. पण एका माणसाला चक्क काही काम न करता एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्ष पगार मिळत होता. मात्र तो इसम कधीच कामावर दिसत नसल्याने त्याचे रेकॉर्ड तपासले असता एचआर विभागाच्या लक्षात आल्यावर हे प्रकरण समोर आले.

इटलीमध्ये एका कर्मचाऱ्यावर पंधरा वर्ष काम न करण्याचा आरोप लावला आहे. या इसमाने 2005 साली काम करणं बंद केलं होतं. मात्र तरीही त्याला पगार मिळत होता. सल्वाटोर स्कुमेस असे त्याचे नाव असून कॅचनजारो शहरातील पुगलीस सियासिओ रुग्णालयात तो कर्मचारी होता. मात्र काम सोडूनही त्याचा पगार सुरूच होता. गेल्या पंधरा वर्षात त्याला 4 कोटी 86 लाखांचा पगार दिला गेला आहे. 2005 साली या इसमाने रुग्णालयच्या संचालकांना त्याच्याविरोधात तक्रार दाखल न करण्यासाठी धमकी दिली होती. ते संचालक निवृत्त झाले तर त्याचा पगार सुरूच राहिला. मात्र प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेकॉर्ड तपासला असता प्रकरण समोर आले. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून त्याची उपस्थिती आणि पगाराचे रेकॉर्ड तपासले असता सत्य परिस्थिती कळली.

इटलीच्या वृत्तसंस्था एएनएसएच्या वृत्तानुसार स्कुमेसवर फसवणूक, बळजबरीने वसुली आणि कार्यालयाचा केलेला दुरुपयोग याबाबत चौकशी सुरू आहे. अनुपस्थित असूनही त्याची उपस्थिती दाखवणे, त्याच्यावर कारवाई न करणे याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या सहा जणांची चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या