एकाचवेळी तरुणीला दिले कोरोना लसीचे सहा डोस…वाचा नेमके काय झाले..

सध्याच्या काळात कोरोनाबाबत विविध अनोख्या बाबी उघड होत आहेत. अशीच एक लसीकरणाबाबतची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीचे दोन  डोस देण्यात येत आहेत. हे दोन डोसही ठराविक दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहेत. मात्र,एका तरुणीला एकाचवेळी लसीचे सहा डेस देण्यात आले आहेत.

ही घटना इटलीतील असून एका तरुणीला फायझर बायोटेक लसीचे सहा डोस एकाचवेळी देण्यात आले आहेत. मात्र सुदैवाने लसीच्या अतिडोसांचा त्या तरुणीवर कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही. ही घटना परिचारिकेच्या नजरचुकीने घडल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणीला इटलीच्या टस्कन येथील नोआ रुग्णालयात ही लस देण्यात आली होती.

23 वर्षाची ही तरुणी लस घेण्यासाठी गेली होती. तेव्हा परिचारिकेने लसीच्या कुपीतील सर्व औषध इंजेक्शनच्या सिरींजमध्ये घेतले आणि तरुणीला लस दिली. मात्र, नंतर कुपीतील सर्व औषध तरुणीला देण्यात आल्याचे समजले, तेव्हा एकच खळबळ उडाली. एका कुपीत सहा डोस होतील एवढे औषध असते. त्यामुळे या तरुणीला एकाचवेळी सहा देण्यात आले. परिचारिकेच्या चूक लक्षात आली तेव्हा तिने रुग्णालय प्रशासनाला त्याबाबत कळवले.

या घटनेनंतर फ्ल्युइड्स आणि पॅरासिटीमोल देऊन रुग्णालय प्रशासनाने चोवीस तास तिला निरीक्षणाखाली ठेवले होते.  तरुणीची प्रकृती स्थिर असल्याने सोमवारी तिला घरी सोडण्यात आले. कोरोना लसीच्या अतिडोसाने तिच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. एएफपीच्या वृत्तानुसार देशाच्या वैद्यकीय नियामकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या ही लस 90 देशांतील लोकांना दिली जात आहे. लवकरच ही कंपनी सिंगापूरमध्येही या लसीचे उत्पादन सुरु करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या