हेडली गावात डेडली कामगिरी, ही बातमी वाचाल तर जवानांना सॅल्यूट ठोकाल

43

सामना ऑनलाईन | कोंडागाव 

नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील हेडली गावात इंडो तिबेटन पोलीस दलाच्या जवानांनी आपल्या असीम धैर्याचे प्रदर्शन पुन्हा केले आहे. आयटीबीपी दलाने या गावातील अत्यवस्थ महिलेला भर पावसात कंबरभर पाणी आणि गुडघाभर चिखलातून खांद्यावर वाहून नेत ४० किमी अंतरावरील रुग्णालयात नेले. जवानांच्या या धीरोदात्त कृतीमुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहेत.

आठ दिवसापूर्वीच प्रसूती झालेल्या शेवाती यादव या महिलेची प्रकृती अचानक गंभीर झाली. तिला उपचारासाठी ४० किमी अंतरावरील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेणे आवश्यक होते. हेडली गाव दुर्गम प्रदेशात असल्याने तिथे वाहतुकीची व्यवस्थाच नाही . तुफानी पावसाने या भागातल्या नदी-नाल्याना पूर आलेला आहे. सर्वत्र चिखल असल्याने अत्यवस्थ शेवातीला एवढ्या दूर नेणे ही कठीण गोष्ट होती. ही माहिती आयटीबीपीच्या ४१व्या बटालियनचे कमांडंट सुरिंदर खत्री यांना कळताच त्यांनी तत्काळ सूत्रे हलवली आणि त्वरित बचाव अभियान सुरु केले. कंपनी कमांडर दीपक भट्ट यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी खांद्यावरील स्ट्रेचरवरून आजारी महिलेला ४० किमी अंतरावरील रुग्णालयात पोचवले. जवानांनी चिखल तुडवत कंबरेएवढ्या पाण्यातून मार्ग काढत आपले बचाव अभियान पूर्ण केले . आता अत्यवस्थ महिलेचा धोका टळला आहे. जवानांच्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या