आता आयटीआय परीक्षाही ऑनलाइन?

149

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडतो. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरशः हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर ऑनलाइनचे भूत कायम आहे. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही ते लादले जाणार आहे. आयटीआय परीक्षा ऑनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना विशेषतः संगणकाचा अभाव असलेल्या तसेच नियमित लोडशेडिंगचा सामना करणाऱया ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

राज्यात 400 हून अधिक आयटीआय संस्था आहेत. त्यात सुमारे 1 लाख 30 हजार विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. त्यांची सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेतली जाते. थिअरी आणि प्रॅक्टिकल असे परीक्षेचे स्वरूप असते. आता थिअरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालयाला दिला आहे. परंतु या ऑनलाइन व्यापामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास होईल याचा काहीच विचार केला गेलेला नाही.

प्रस्ताव अद्याप विचाराधीन

ऑनलाइन परीक्षा घेतल्यास प्रक्रिया वेगाने पार पडेल. त्याच हेतूने तसा प्रस्ताव केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालयाला पाठवण्यात आला आहे. अद्याप तो मंजूर झालेला नाही.
– योगेश पाटील, व्यवसाय शिक्षण सहसंचालक

विद्यार्थी गावात, परीक्षा केंद्रे शहरात

ऑनलाइन परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी सरकारकडून सॉफ्टवेअर कंपन्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रेही मोजकीच असणार आहेत. गावातल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात यावे लागेल. वाडा येथे राहणाऱया विद्यार्थ्याला परीक्षेसाठी घरापासून अनेक मैल दूर ठाणे येथे यावे लागेल. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा त्यांना परवडणारी नाही असे तज्ञांचे मत आहे.

शिक्षकांचा तुटवडा कधी दूर करणार?

ऑनलाइन परीक्षा घेण्यापूर्वी आयआयटी संस्थांमधील शिक्षकांचा तुटवडा दूर करा. 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा नियम आहे. परंतु शिक्षकांच्या तुटवडय़ामुळे एका शिक्षकाला 60-60 विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष देणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांवर ऑनलाइन परीक्षा लादणे योग्य नाही.
– टी. एन. पाटील, महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना

70 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागांत

परिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेणे शक्य न झाल्याने बहुतांश विद्यार्थी आयटीआयचा पर्याय निवडतात. आयटीआयमध्ये शिकणारे 70 टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संगणकाचे ज्ञान नसते आणि संगणक असला तरी लोडशेडिंगमुळे त्याचा जास्त वापर करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे साहजिकच अवघड जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या