आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना आवडीच्या ठिकाणी बदली मिळणार – मंत्री नवाब मलिक

511

राज्यातील 417 आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱयांना त्यांच्या चॉईसनुसार बदली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. कर्मचाऱयांना त्यांच्या बदलीच्या जागेसाठी दहा पर्याय देता येतील. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या होतील.

राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. कौशल्य व विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातील 417 आयटीआय येतात. यात सहा हजार कर्मचारी व शिक्षक आहेत. या खात्याच्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱयांच्या बदलीसाठी आमदार-खासदार व राजकीय लोकांची दररोज अनेक शिफारसपत्रे येतात. या कर्मचाऱयांना घरगुती तर कधी वैयक्तिक कारणांमुळे जिल्हा किंवा घराच्या जवळ बदल्या हव्या असतात. त्यामुळे आता आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱयांना त्यांच्या आवडीनुसार बदली देण्यात येईल. त्यासाठी त्यांच्याकडून बदलीचे दहा पर्याय मागवण्यात येतील. या प्रणालीच्या माध्यमातून 2020-21पासून सर्व प्रकारच्या बदल्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जाणार आहेत. राज्यात ग्रामविकास विभागानंतर ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवणारा कौशल्य विकास विभाग आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. सध्या बदल्यांसाठी सुमारे 700 अर्ज आले असून या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील.

या कर्मचाऱयांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी https://hrms.dvet.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या