‘बाहुबली’ प्रभास घेणार आता एवढं मानधन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’ चित्रपटात साकारलेल्या अमरेंद्र बाहुबली आणि महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेमुळे प्रत्येक तरुणीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभासनं आपल्या मानधनात तब्बल पाच कोटी रुपयांची वाढ करण्याचं ठरवलं आहे. बाहुबलीमध्ये महिष्मती साम्राज्यातील प्रजेची काळजी घेणारा जाणता राजा, आपली आई शिवगामीचा आज्ञाधारी मुलगा, देवसेनेचा पती, अवंतिकेचा प्रेमी अशा सर्व भूमिका लीलया पेलणाऱ्या बाहुबली अर्थात प्रभास देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्धी मिळवली आहे.

प्रभासची बॉडी, त्याची स्टाईल, बोलण्याची लकब, प्रेमळ नजरेचे लाखो चाहते आहेत. प्रभासनं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. पाच वर्ष सतत याच चित्रपटासाठी तो झटत होता. त्यासाठी त्यानं १० कोटींची जाहिरातही नाकारली होती. आता त्याच्या या मेहनतीचं चीज झालं आहे. १ हजार कोटी रुपये कमावणारा पहिला हिंदुस्थानी चित्रपट होण्याचा मान प्रभासच्या बाहुबलीनं मिळवला आहे. चित्रपटाच्या यशाचा फायदा आता प्रभासला होणार आहे.

एका चित्रपटासाठी २०-२५ कोटी रुपये घेणारा प्रभास आता पाच कोटी रुपयांची वाढ करणार असल्याचं वृत्त आहे. बाहुबलीच्या यशांतरही त्यानं ‘बाहुबली-२’ साठी २५ कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या