
जसप्रीत बुमराच्या पुनरागमनामुळे हिंदुस्थानच्या गोलंदाजी ताफ्याची धार वाढली आहे. आगामी महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपपूर्वी संघात चार वेगवान गोलंदाज फिट असणे ही टीम इंडियाची कामगिरी हिट असण्याचे शुभसंकेत असल्याचे मत गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेने व्यक्त केले आहे.
हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या सुपर-फोर लढतीच्या पूर्वसंध्येला पारस म्हांब्रे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)त जसप्रीत बुमराच्या फिटनेसकडे आमचे लक्ष होते. आता आमच्याकडे चार स्टार वेगवान गोलंदाज आहेत. यातील जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज व हार्दिक पंडय़ा हे त्रिकूट पहिली पसंत असल्यामुळे शमीसारख्या प्रतिभावान गोलंदाजाला बाहेर बसावे लागत आहे. शमीला संघाबाहेर बसविणे ही सोपी गोष्ट नाहीये. त्याचा अनुभव आणि प्रभावी कामगिरी बघता एकप्रकारे त्याच्यावर हा अन्यायच होय. मात्र, आम्ही अशा खेळाडूंच्या संपर्कात राहून, त्यांना विश्वासात घेऊन असे निर्णय घेत असतो.