इवांकाने केलं 1200 किमी सायकल चालवणाऱ्या ज्योतीचं कौतुक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हिंदुस्थानात लॉकडाऊन असल्याने ठिकठिकाणी अडकून पडलेले नागरिक आता घरी परतत आहेत. काही दिवसांपूर्वी बिहार येथील ज्योती नावाची एक मुलगी 1200 किमीचा सायकल प्रवास करून घरी पोहोचल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. या वृत्तामुळे ज्योतीच्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका हिचाही समावेश आहे. पण, इवांकाला नेटकऱ्यांनी तिच्या याच कौतुकामुळे ट्रोल केलं आहे.

इवांकाने ज्योती हिचं कौतुक करणारं एक ट्वीट केलं. त्यात ती म्हणाली की, 15 वर्षांच्या ज्योती कुमारी हिने आपल्या जखमी वडिलांना सायकलवर बसवून घरी पोहोचवलं. त्यासाठी तिने सात दिवस 1200 किमीचा प्रवास केला. ही सहनशीलता आणि प्रेम यांनी हिंदुस्थानी नागरिक आणि सायकलिंग फेडरेशन यांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे, असं इवांका तिच्या ट्वीटमध्ये म्हणाली.

पण, इवांका हिच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं. ज्योती हिचा त्रास समजून घेण्याऐवजी तू तिचं कौतुक करणं चूक असल्याचा सूर नेटकऱ्यांमध्ये उमटला. अशा महामारीच्या वेळी गरिबी आणि हालअपेष्टा यांच्यात रोमांचक गोष्टी शोधणं म्हणजे क्रूरतेची परिसीमा आहे. एखाद्याचा नाईलाज प्रेक्षणीय असू शकत नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी इवांका हिला ट्रोल केलं. दरम्यान, काही नेटकरी तिच्या बाजूनेही व्यक्त झाले. ज्योती हिने वडिलांच्या प्रेमापोटी हे पाऊल उचललं आणि धाडसाने तडीला नेलं. तिच्या या प्रेमाचं कौतुक व्हायलाच पाहिजे, त्यात काही चूक नाही, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या