
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 विकेटने धुव्वा उडवला. रोहितसेनेने आशिया चषकावर आठव्यांदा मोहर उमटवल्यानंतरही टीम इंडियाच्या चिंता वाढल्या आहेत. आशिया चषकादरम्यान श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापत झाली. त्याने यंदाच्या स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला. श्रेयस अय्यर वारंवार दुखापतग्रस्त होत असल्यामुळे हिंदुस्थानात होणाऱ्या वन डे वर्ल्डकपसाठी त्याची संघात निवड करू नये असा सल्ला गौतम गंभीर याने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिला आहे.
श्रेयस अय्यर मार्च महिन्यापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे त्याला आयपीएलही अर्ध्यावर सोडावे लागले होते. शस्त्रक्रियेमुळे तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याला आणि वेस्ट इंडिज दौऱ्यालाही मुकला होता. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याने काही काळ घालवला आणि फिट झाल्यानंतर त्याची आशिया चषकासाठी निवड झाली. मात्र आशिया चषकात अय्यर फक्त एक सामना खेळला आणि जायबंदी झाला. यावरून गौतम गंभीर याने राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीलाही धारेवर धरले आहे.
ही चिंतेची बाब आहे. श्रेयस अय्यर बऱ्याच काळापासून संघातून बाहेर होते आणि आशिया चषकासाठी त्याची निवड झाली. इथेही एकच सामना खेळल्यानंतर तो पुन्हा जायबंदी झाली. त्यामुळे वन डे वर्ल्डकपमध्ये त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते, असे गौतम गंभीर म्हणाला.
लंकादफन! हिंदुस्थानने आशिया चषकावर नाव कोरले, सिराजच्या बुलडोझरपुढे लंकेचा पन्नाशीतच चेंदामेंदा
येत्या काही दिवसात आपल्याला कळेल की श्रेयस अय्यर संघात नसेल आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड होईल. वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत नेहमी फिट खेळाडूंसह उतरायला हवे. जर स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याला त्रास झाला आणि पर्यायी खेळाडू मिळाला नाही तर विचार करा काय होईल. त्यामुळे त्याच्या फॉर्मचा विचारही करायची आवश्यकता नाही. 7-8 महिन्यापूर्वी तो फॉर्मात होता आणि त्यानंतर त्याने फक्त एकच सामना खेळला आहे, असेही गंभीर म्हणाला.