गळून पडता पानांचा बहर, गिरीपुष्पाला येते फुलायची लहर !

139

जे.डी.पराडकर

संगमेश्वर- शेवर वृक्षांच्या पानांचा बहर गेल्यावर त्याचे रुप भेसूर दिसते. काही कालावधीतच या भेसूरपणात लाल टपोऱ्या फुलांचा एक उल्हसित बहर आपलं वेगळेपण अधोरेखित करतो. तद्वत गिरीपुष्प या शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या वृक्षांच्या पानांचा बहर गेल्यावर त्याला फुलायची लहर येते. सध्या शेवर, पळस या वृक्षांबरोबरच कोकणात जागोजागी गुलाबी रंगाच्या नाजूक परंतु सुंदर फुलांनी गिरीपुष्प बहरल्याचे नयनरम्य दृष्य पाहायला मिळत आहे.
कोकणात गिरीपुष्पाची मोठी लागवड केलेली असल्याने जागोजागी त्यांच्या गुलाबी फुलांचे ताटवे हिरव्यागार निसर्ग सौंदर्यात भर घालत आहेत.

सध्याच्या हंगामात गिरीपुष्पाची पानगळ होवून त्याच्या खोडाला जागोजागी फुलांचे ताटवे बहरतात. सरळसोट वाढणाऱ्या या वृक्षाला पोपटी रंगाची पाने असतात. वेगानं वाढणाऱ्या या वृक्षाची लागवड कोकणात बहुतांशी ठिकाणी शेताच्या बांधावरुन केलेली पाहायला मिळते. हा वृक्ष शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. याची पानं शेतामध्ये सेंद्रीय खत म्हणून उपयुक्त समजली जातात. गिरीपुष्प जमिनीत नायट्रोजनचा पुरवठा करतो. याच्या बियांचा आणि पानांचा उंदराच्या विषासाठी वापर केला जातो.

कृषी विभागाकडूनही गिरीपुष्पाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह केला जातो. याच्या लागवडीचे महत्व पटल्याने कोकणातील असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा जवळपास गिरीपुष्पाची लागवड केल्याचे आढळून येते. मोठ्या प्रमाणावरील लागवडीमुळे आता फुलं आल्यावर सर्व परिसर गुलाबी रंगांच्या ताटव्यांनी निसर्गाच्या सौंदर्यात भर घालायचं काम करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या