जेपी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष, संसदीय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अमित शहा यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपचे नवे अध्यक्ष कोण होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शहा यांची जागा आता जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जेपी नड्डा घेणार आहेत. जेपी नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. परंतु डिसेंबरपर्यंत अमित शहाच अध्यक्षपदी राहणार आहेत.

दिल्लीमध्ये सोमवारी भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जेपी नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमित शहा यांनी गेली पाच वर्ष अध्यक्षपदावर आपली भूमिका चोख बचावली. आता अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा कारभार दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्याचा आग्रह केला. त्यामुळे जेपी नड्डी यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

नड्डा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्येही भाजपने उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकल्या होत्या. याचे श्रेय नड्डा यांना जाते असे भाजप नेत्यांनी सांगितले. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.