देशाच्या सुरक्षेबाबत बोलणारे संरक्षण समितीच्या बैठकांनाच गैरहजर, जे.पी. नड्डा यांचा राहुल गांधींवर पलटवार

गलवान खोऱ्यातील संघर्षावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या चीन संदर्भातील भूमिकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देशाच्या सुरक्षेबाबत बोलणारे संरक्षण समितीच्या बैठकांनाच गैरहजर असतात, असा पलटवार केला आहे.

चीन सीमा प्रश्नावरून देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणारे राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत सहभागी झाले नाहीत याकडे भाजप अध्यक्ष नड्डा यांनी ट्विट करत लक्ष वेधले आहे. बैठकीस हजर नसले तरी ते प्रश्न विचारायला पुढे असतात. ते सातत्यानं देशाचं खच्चीकरण आणि लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जबाबदार विरोधी पक्षनेत्याने करायला नको त्या गोष्टी ते करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणासंबंधित समित्यांचं काही स्थान नाही. तर कमिनशन महत्त्वाचं वाटतं. काँग्रेसमध्ये असे अनेक पात्रता असलेले नेते आहेत, ज्यांना संसदीय विषयांचं महत्त्व माहीत आहे, पण हे घराणे अशा नेत्यांना मोठं होऊ देणार नाही. हे खरोखरच दु:खद असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या