पटेल ना पटेल, ऐतिहासिक नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल!

554

100 व्या ऐतिहासिक नाट्यसंमेलनाने वादाची नांदी दिली आहे. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड कोणत्याही वादाशिवाय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी जब्बार पटेल यांच्याऐवजी मोहन जोशी यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले. त्यामुळे बैठकीत जोरदार वादावादी झाली. संमेलनाध्यक्षांचे नाव ठरविणे एवढाच अजेंडा असलेली ही बैठक तब्बल पाच तास चालली. अखेर यंदा जब्बार पटेल अध्यक्ष आणि पुढील वर्षी मोहन जोशी यांना संधी असा गुरुत्वमध्य काढून या वादनाटय़ावर पडदा पडला. बैठकीतील या वादळी चर्चेची नंतर यशवंत नाटय़गृहाबाहेर जोरदार चर्चा सुरू होती हे विशेष!

नाटय़संमेलनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे अर्ज होते. त्यापैकी पटेल यांच्या नावावर कार्यकारिणीने एकमताने शिक्कामोर्तब केले होते. तशी घोषणा नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी 20 नोव्हेंबर रोजी केली होती. तसेच नियामक मंडळाच्या बैठकीनंतर यावर अधिकृत घोषणा होईल असे सांगितले होते. त्यानुसार आज नियामक मंडळाची बैठक झाल्यानंतर पटेल यांची निवड एकमताने झाल्याने कांबळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नियामक मंडळाच्या बैठकीआधीच पटेल यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले. तब्बल पाच तासांची वादळी चर्चा झाली. पटेल यांच्यापेक्षा मोहन जोशी यांचे मराठी रंगभूमीसाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा विचार का झाला नाही, असा सवाल नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी केली. कार्यकारिणीची मनमानी सुरू असून पटेल यांची निवड घटनाबाह्य असल्याचा आरोप यावेळी झाला. जोशी यांना परिषदेच्या 22 शाखांचा तर पटेल यांना फक्त 14-15 शाखांचा पाठिंबा असल्याचा दावा सदस्यांनी केला. यावरून वादावादी झाली. नियामक मंडळाचे सदस्य जमिनीवर बसले, मात्र अध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा खुर्चीवर बसले. जर मोहन जोशी यांना 101 व्या संमेलनाचे अध्यक्षपद करत असाल तर 100 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतो असा ठराव ऐरोली शाखेने मांडला. हे कार्यकारिणीच्या सदस्यांनी कबूल असल्याचे सांगत समेट केल्याचे सांगण्यात येते.

धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार – विशाल शिंगाडे
नाटय़ परिषदेच्या धाराशीव शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या मनमानीविरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. मोहन जोशी यांच्या नावाला 22 शाखांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंगाडे यांनी केला. पटेल यांचे नाव नियामक मंडळाच्या बैठकीआधीच कसे काय घोषित केले, असा सवालही त्यांनी केला. तक्रारीत हा एकच मुद्दा नसून नियामक मंडळातील रिक्त जागा, खर्चाचा ठराव, नाटय़ परिषदेने गेल्या दोन वर्षांत एकही उपक्रम राबवला नसल्याबद्दलही तक्रार असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.

संमेलनाला जाणार नाही – सविता मालपेकर
अध्यक्षपदासाठी दोन अर्ज होते तर एकाच अर्जावर का विचार केला? तुमचं जर आधीच ठरलं होतं तर नियामक मंडळाची बैठक घेण्याचे नाटक कशाला, असा सवाल सदस्य सविता मालपेकर यांनी केला. आज जो गेंधळ झाला तो होऊ नये म्हणून सुकाणू समिती गठीत करू अशी आम्ही मागणी केली होती तीही फेटाळून लावण्यात आली. ज्या माणसाने मराठी रंगभूमीसाठी भरीव योगदान दिले आहे तोच अध्यक्ष व्हावा असे मला वाटतंय. त्यामुळे मी आज नियामक मंडळाच्या बैठकीत निषेध नेंदवला आहे. मी संमेलनाला जाणार नाही, असे मालपेकर म्हणाल्या.

मांडवली कशी झाली?
यंदाचे संमेलन 100 वे. अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करावी.
पुढील वर्षी 101 वे संमेलन. त्या संमेलनाचे अध्यक्षपद मोहन जोशी यांना द्यावे.

संमेलन अध्यक्षांची निवड घटनेनुसारच झाली आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. मराठी रंगभूमी ग्लोबल करण्यात पटेल यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. आज याची अधिकृत घोषणा करताना आनंद होत आहे. 100 क्या नाटय़संमेलनाबाबत आधी काही ठरलं नक्हतं. त्यामुळे हे संमेलन पुढे जाईल की काय? अशी चर्चा होती. आता तो किषयही राहिला नाही.
-प्रसाद कांबळी, अध्यक्ष नाटय़ परिषद

आपली प्रतिक्रिया द्या