संतापजनक! भगवे कपडे आणि धर्मदंडावर आक्षेप घेत परमहंसाचार्यांना ताजमहाल पाहण्यापासून रोखले

हातात धर्मदंड आणि अंगावर भगवे कपडे असल्याने जगद्गुरु परमहंसाचार्यांना जगप्रसिद्ध ताजमहालात जाण्यापासून मनाई करण्यात आली. त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना पोलिसांनी धक्के मारून बाहेर काढण्याचेही सांगितले जात आहे. परमहंसाचार्य हे मंगळवारी अयोध्येहून आग्र्याला गेले होते. यावेळी त्यांनी ताजमहाल पाहायचं ठरवलं होतं, मात्र त्यांना पोलिसांनी ताज महाल परिसरात प्रवेश दिला नाही. आपल्यासोबत झालेल्या या गैरवर्तनाबाबत आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं परमहंसाचार्यांनी सांगितले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने परमहंसाचार्यांची फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यात ते म्हणाले की, ‘मी पहिल्यांदाच ताजमहाल पाहायला गेलो होतो. मला तिथल्या लोकांचे वर्तन पाहून धक्का बसला होता. हे का होतंय आणि कोणाच्या इशाऱ्यावर होतंय ?’.  परमहंसाचार्यांनी ताजमहालात प्रवेश घेण्यासाठी रितसर तिकीटही काढलं होतं, तरीही त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. अंगावरील भगवी वस्त्रे आणि हातातील धर्मदंडामुळे आपल्याला आत जाण्यास मनाई करण्यात आली असा आरोप परमहंसाचार्यांनी केला आहे. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तिथे असलेली इतर मंडळीही नाराज झाल्याचे दि0सत होते असंही त्यांचं म्हणणं आहे.

परमहंसाचार्यांनी म्हटलंय की ताजमहालच्या जागी पूर्वी भगवान शंकराचे मंदिर होते. मोगलांच्या आक्रमणानंतर पिंडीबाबतचा चुकीचा इतिहास सांगण्यात आला. आपण तो तेजोमहाल पाहायला आलो होतो असं परमहंसाचार्यांनी म्हटले आहे. परवानगी नाकारल्याने संतापलेल्या परमहंसाचार्याने आता ताजमहालाबाहेर भगव्या वस्त्रांतील लोकांना बंदी असा बोर्ड लावा अशी टीका केली. आपल्यासोबत जो प्रकार सुरू होता तो पाहून एका विशिष्ट धर्माची लोकं हसत होती असंही परमहंसाचार्यांनी म्हटले आहे.