जे. पी. नड्डा वर्षभर भाजप अध्यक्ष पदावर राहणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणखी वर्षभर अध्यक्षपदावर राहणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. त्यामुळे नड्डा यांच्यावर लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी पडली आहे.

जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्याकडेच भाजपची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. दरम्यान, सोमवारी एका भाषणात नड्डा भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले होते, मी तुम्हाला सूचना देतो, माहिती घेतो हे कधी तुम्हाला आवडतही नसावे, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे. त्यापुढेही देत राहणार आहे, असेही सांगितले होते. त्यामुळे जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळू शकते याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार भाजपच्या कार्यकारिणीमध्ये आज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जावा हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळय़ांनी अनुमोदन दिले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला गेला आहे अशी घोषणा केली.