माजलगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा अपक्ष लढण्याची जगताप कुटुंबाची तयारी

माजलगाव मतदारसंघात पंचवीस वर्षांपूर्वी  संघर्ष करून अपक्ष म्हणून निवडून आलेले बाजीराव जगताप यांना 1995 व 99 साली दोन्हीही वेळी भाजपाच्या हट्टापायी उमेदवारी पासून वंचित राहावे लागले होते. आता तीच पुनरावृत्ती त्यांच्या मुलाच्या वाट्यास आली आहे. सहा महिन्यांपूर्वी उमेदवारीच्या पक्क्या शब्दावर भाजपात प्रवेश केलेल्या छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांच्याऐवजी अंबा साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांच्या पारड्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघाची उमेदवारी टाकली. त्यामुळे जगताप कुटुंबाने तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी केली असून पक्ष कोणताही असो निवडणूक लढवणारच असे मोहन जगताप यांनी सांगितले.

दरम्यान या बैठकीत कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्याने त्यांना रडू कोसळले. अभी नही तो कभी नही, या भावनेने निवडणूक लढवावी अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेनेचे बाजीराव जगताप यांनी आपल्या कामाच्या जोरावर १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी पक्षाकडून मागितली होती मात्र त्यावेळी भाजपच्या हट्टामुळे ही जागा जगताप यांना मिळाली नाही व अखेर त्यांना अपक्ष म्हणून लढून ते विजयी झाले व त्यांनी पुन्हा शिवसेनेचे आमदार म्हणून काम केले. मात्र 99 च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये पुन्हा भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर जगताप यांना पक्ष सोडावा लागला होता. आता बाजीराव जगताप यांचे चिरंजीव छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी त्यांना माजलगाव विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची हमी दिली गेली व त्यादृष्टीने जगताप यांनी लोकसभेपासून मोठा जनसंपर्क वाढवला. खासदार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी त्यांनी मेहनत घेतली. मागील काही दिवसांपासून मतदारसंघात रमेश आडसकर किंवा मोहन जगताप यापैकी कोणास उमेदवारी मिळणार, याविषयी प्रचंड औत्सुक्य होते मात्र आज रमेश आडसकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली व त्यानंतर जगताप व त्यांच्या समर्थकात अस्वस्थता निर्माण झाली. अन्याय झाला या भावनेतून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा सूर त्यांच्या समर्थकांतून निघत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या