जगबुडी, वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पावसाचा तडाखा

54

सामना प्रतिनिधी, खेड, वैभववाडी

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवासांपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायरन वाजवून किनारपट्टीवरील जनतेला अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. अनेक तालुक्यात पावसाचे पाणी शिरल्याने गावे जलमय झाली आहेत. जगबुडी, वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

करूळ घाटात दरड कोसळली

20170626_113943
वैभववाडी : करूळ घाटात रविवारी रात्री गगनबावडापासून २ कि. मी. अंतरावर दरड कोसळली तर भुईबावडा घाटात पडझड सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. करूळ मार्गावरील वाहतूक भुईबावडामार्गे वळविण्यात आली. सोमवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तसेच रविवारी रात्री भुईबावडा घाटातही एक-दोन ठिकाणी दगड रस्त्यावर आले होते. वाहनचालकांनी दगड बाजूला करून वाहतूक सुरू केली आहे. एकंदरीत दोन्ही घाटमार्गाची अवस्था गंभीर असून पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे डोकेदुखी ठरणार आहेत.

नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
खेड : कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या दोन्ही नद्यांची धोक्याची पातळी ही ७ मीटर इतकी आहे. आज सकाळी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने खेड नगरपालिकेने सायरन वाजवून व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. नारंगी नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी गावाजनीकच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली.

मान्सूनने जोर पकडला
मालवण : मान्सूनने कोकणात जोर पकडला आहे. समुद्रही खवळला असून किनारपट्टीवर लाटांचा तडाखा बसत आहे. दोन दिवस समुद्राला उधाणसदृश स्थिती दिसून आली. सोमवारी दिवसभर पावसाचा व वाऱ्याचा जोर होता. पावसामुळे पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. या पावसाळी हंगामात आतापर्यंत ६६७ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

malvan

मसुरे गडघेरा येथील सुनंदा अनंत येसजी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. येसजी कुटुंब हे गरीब असून पंतप्रधान आवास योजनेतून त्यांनी नवीन घर बांधले होते. एक महिना होत नाही तोवर भेडल्या माडाच्या रूपाने या घरावर कुऱ्हाड कोसळली. सायंकाळी भेडला माड घराच्या मागील बाजूने घरावर पडल्यामुळे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण शहरातील मेढा- कोथेवाडा येथे ग्रामीण रुग्णालय परिसरामागील गोसावी यांच्या जागेतील आंब्याचा मोठा वृक्ष कोसळला. हा वृक्ष शेजारील आनंद पारकर यांच्या जागेत पडून पारकर यांचे दगडी कंपाऊंड कोसळून नुकसान झाले.

पावसाने जोर पकडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना जोर आला आहे. नद्या, खाडीपात्रातही पाण्याची पातळी वाढली असून ओहळ, नाले, धबधबे वाहण्यास सुरुवात झाली आहे. गावात कडणीचे (नदीकिनारी ) मासे, कुर्ले (खेकडे) पकडण्यास गर्दी होत आहे तर पावसाळी पर्यटन ठिकाणी पार्ट्या जोरदार सुरू झाल्या आहेत.

दापोलीत संततधार, उधाणाचे पाणी किनारपट्टी भागात घुसले
मंडणगड : तालुक्यातील केळशी, आंजर्ले, हर्णै, आडे, पाडले, पाळंदे, मुरुड, कर्दे, पाजपंढरी, लाडघर, बुरोंडी, कोळथरे, दाभोळ या समुद्रालगतच्या भागांमध्ये सखल भागात उधाणाचे पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या किनारपट्टीलगत वनविभागाने लावलेले सुरू उधाणाच्या पाण्यामुळे उन्मळून पडले तर काही बागायतींमध्ये पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. दापोली मंडणगड रस्त्यावरील शिरसोली येथील नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती तर दापोली कोळबांद्रे रस्त्यावरील कोडजाई नदीवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक कालपासून पूर्णत बंद असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाकवलीमार्गे प्रवास करावा लागल्याने त्यांचे हाल होत आहेत.

झाड उन्मळून पडले

zad

रविवारी रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्यात सुरुवात झाली. या जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान दाभोळ-दापोली हमरस्त्यावर एक भले मोठे झाड पडल्याने या मार्गावरील काही काळ वाहतुक ठप्प झाली. नशिबाने त्या वेळेत कोणतीही वाहतूक नसल्याने तिथे कोणतीही जीवित हानी झाली नाही. झाडाच्या शेजारीच विलास भरण यांचे एक चहाची टपरी सुदैवाने वाचली. ही माहिती मिळताच वणौशी, काजूवाडी व परिसरातील नागरिक तिथे जमा झाले. वणौशी सरपंच प्रकाश तेरेकर यांनी ही माहिती एस.टी. डेपो आणि बांधकाम विभाग यांना कळविली. झाड बाजूला करण्याचे काम कटरच्या सहाय्याने प्रकाश तेरेकर, अशोक जाधव, दीपक गुरव, संजय बारे, उत्तम येवले, बाबू ठसाळ, विलास भुरण, अमित बारे, शिरीष चव्हाण, गणेश वाड यांनी अथक परिश्रम घेऊन हे झाड हटविण्याचे काम केले. नंतर जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण रस्ता वाहतुकीस मोकळा झाला.

समुद्र खवळला, मासेमारी ठप्प
मालवण : मालवण किनारपट्टीवर सोमवारी सकाळी समुद्राची पातळी वाढल्याचे चित्र होते. सोमवारी मालवण बंदर जेटीनजीकच्या किनाऱ्यावर भरलेल्या आठवडा बाजारात समुद्राच्या लाटांनी संरक्षक बंधारा पार करीत धडक दिली. यामुळे संपूर्ण बाजारात पाणी घुसल्याने व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. यात किनाऱ्यालगत बसलेल्या व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. मालवणसह दांडी, रॉक गार्डन या किनारपट्टीवर खवळलेल्या समुद्राच्या लाटा जोरदारपणे धडकत होत्या. रॉक गार्डन परिसरातील खडकाळ भागात उसळत्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी उत्साही व्यक्तींनी गर्दी केली होती. लाटांचा जोर वाढल्यामुळे पारंपरिक पद्धतीची मासेमारीही बंद आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दापोलीत संततधार, वृक्ष उन्मळून पडले
मंडणगड : कालपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे दापोलीतील जनजीवन विस्कळीत झाले असून समुद्राच्या उधाणाचा फटका दापोली तालुक्यातील किनारपट्टीच्या गावांना बसला आहे. या गावांमध्ये समुद्राचे पाणी बागेमध्ये शिरले आहे. तर वनविभागाने लावलेले सुरू मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गेले दोन दिवस दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. त्यातच २५ जूनच्या सायंकाळपासून दापोलीमध्ये पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. काल सायंकाळी पावसाबरोबरच वाराही मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी भलेमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. तालुक्यातील दाभोळ व दापोली शहरामध्ये काही भागांमध्ये झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाऱ्याचा फटका मोठ्या प्रमाणात महावितरणला बसला.

खेडमध्ये धुवाधार
खेड : खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत असल्याने शहरातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेड-दहीवली मार्गावर तळेनजीक दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दहिवली परिसरात काल रात्री वस्तीसाठी गेलेल्या एसटीच्या बसेस तिथेच अडकून पडल्या आहेत. धुवाधार पावसाचा एसटीच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या