जगबुडी पुलाचे जोडरस्ते खड्ड्यात; अपघात होण्याची शक्यता

495

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पुलाच्या दोन्ही बाजुच्या जोडरस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. मात्र हे खड्डे बुजवण्याकडे ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी याच खड्ड्यांवरून खेडमध्ये मोठे महाभारत घडून एका लोकप्रनिधीला नाहक कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागले होते.

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेला नवा पुल गेल्यावर्षी वाहतुकीला खुला करण्यात आला होता. मात्र दोन्ही बाजूचे जोडरस्ते खचल्याने पुल ओलांडणे धोकादायक झाले होते. जोडरस्ते खाल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याना पुलाच्या कठड्यांना बांधण्यात आल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत एवढे मोठे महाभारत घडल्यानंतर जोडरस्त्याचे काम दर्जेदार केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र यावर्षीही जोडरस्त्यांची तीच अवस्था असल्याने गतवर्षी घडलेल्या प्रकाराने ठेकेदार कंपनीने काहीही बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पावसाळ्यात उखडलेल्या महामार्गाची दुरुस्ती करणे ही जबाबदारी चौपदरीकरणाचे काम करणाच्या ठेकेदार कंपनीचे आहे. मात्र कंपनीकडून महामार्गावर पडलेले खड्डे भरले जात नसल्याने ही जबाबदारी नक्की कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये आदळून वाहने देखील नादुरुस्त होत आहे. मात्र ठेकेदार कंपनीची खड्डे भरण्याबाबतची उदासीनता वाहन चालकांच्या मनात संताप निर्माण करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या