वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पहा ‘जय’, ‘रुद्र’ची धम्माल, मस्ती; आजपासून नवे तीन पेंग्विनही पाहता येणार

महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघ आणि ‘करिश्मा’ वाघिणीचे दोन बछडे ‘जय’ आणि ‘रुद्र’ची धम्माल मस्ती पाहता येणार आहे. शिवाय अलीकडेच जन्मलेले तीन नवे पेंग्विनही पर्यटक-मुंबईकरांना पाहता येणार आहेत.

महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्वीनचे कुटुंब विस्तारले आहे. यामध्ये रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ’शक्ती आणि करिश्मा’ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोन बछडय़ांना जन्म दिला होता, तर पेंग्वीन कक्षातही पेंग्वीनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्वीन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक समृद्ध झाले आहे. उद्या 11 मे 2023 पासून पर्यटक या नवीन पाहुण्यांना पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहे. यामध्ये पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱया दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार असल्याचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उपअधीक्षक तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील पेंग्वीन कक्षातील पेंग्वीनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्वीनची संख्या वाढून आता एकूण 15 झाली आहे.

असा वाढला परिवार

छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून 12 फेब्रुवारी रोजी शक्ती वाघ (वय 7 वर्षे) आणि करिश्मा वाघीण (9 वर्षे) या जोडीला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणले गेले. करिश्मा वाघिणीने गतवर्षी 4 नोव्हेंबर रोजी दोन रुबाबदार नर बछडय़ांना जन्म दिला आहे. पुढील दीड ते दोन कर्षे या बछडय़ांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे.

 पेंग्वीन कक्षात सध्या नर आणि मादी अशा चार जोडय़ा आहेत. त्यात डोनाल्ड आणि डेझी या जोडीने 21 फेब्रुवारी रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने 2 ऑक्टोबर 2022 रोजी सिरी (मादी) तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने 13 डिसेंबर 2022 रोजी निमो (नर) अशा तीन पिलांना जन्म दिला. ओरिओ आणि बबल या पेंग्वीन जोडीला अद्याप पिलांची प्रतीक्षा आहे.