जय दाखवा नाहीतर श्राद्ध करा!

193

>>ऍड. प्रतीक राजूरकर<<

जय वाघ बेपत्ता झाल्याला एक वर्ष पूर्ण होत नाही तोवरच श्रीनिवास वाघाचीही रेडिओ कॉलरच्या माध्यमातून शेवटची नोंद झाली. ‘श्रीनिवास’ या वाघाचा मृत्यू व ‘जय’ या वाघाचे बेपत्ता होणे, हे कॉलरिंग करणाऱया यंत्रणेचेच अपयश नसून वाघांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वनखात्याचेही अपयश आहे. वाघांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या या एकंदर स्थितीचा वेध घेणारा हा लेख.

न स्याद्वनमृते व्याघ्रान्व्याघ्रा न स्युरृते वनम्।

वनं हि रक्ष्यते व्याघ्रैर्व्याघ्रान्रक्षति काननम् ।।

महाभारतातील विदुर नीतीमधील या श्लोकाचा अर्थ धृतराष्ट्राला संबोधित करतो. वन वाघाचे रक्षण करतात आणि वाघ वनांचे रक्षण करणारे आहेत. विदुराचा हा सल्ला आज पुन्हा एकदा आजच्या ‘धृतराष्ट्र’ बनलेल्या सरकारी यंत्रणा आणि जनतेसाठीही समर्पक आहे. कारण जी परिस्थिती सिमेंट-काँक्रीटच्या जंगलातील नागरिकांची आहे तशीच काहीशी परिस्थिती वन्य प्राण्यांची झाली आहे. त्यातील वन पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असलेल्या पराक्रमी वाघाची दुर्दशा आणि हतबलता तर उघड गुपित म्हणून चर्चिली जाऊ लागली आहे. व्याघ्रप्रेमी नागरिक, वन्यजीव अभ्यासक इत्यादींच्या चर्चेतील एकंदरीत कल बघता वाघाच्या अस्तित्वाची चिंता गंभीर आहे. अयोग्य नियोजन आणि हलगर्जीपणामुळे वाघासारख्या रुबाबदार प्राण्याचे नुसतेच हाल होत नसून त्यांना जगण्यासाठी खडतर संघर्ष करावा लागत आहे.

वाघाच्या संख्येतील वृद्धी ही निश्चितच आनंददायी आहे, पण दुसरीकडे वाढलेल्या वाघांची संख्या हाताळणारी यंत्रणा आणि तिचे अयोग्य नियोजन याकडे दुर्लक्ष होत आहे ही निसर्गप्रेमींची मुख्य चिंता आहे. वाघांची संख्या वाढणे हे पूर्णतः निसर्गाचे वरदान आहे. त्याचे श्रेय निसर्गाला द्यावे लागेल, पण वाघ टिकविणे याचे श्रेय मानवाला घ्यायचे असल्यास त्याकरिता पोषक वातावरण आणि उपयुक्त नियोजनाची आवश्यकता आहे.

व्याघ्रप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या दोन वाघांचे अचानक निघून जाणे गेल्या वर्षभरात व्याघ्रप्रेमींच्या हळहळण्याचे मुख्य कारण आहे. त्यापैकी ‘जय’चा अजून पत्ता लागला नसताना ‘जय’चेच अपत्य असलेल्या ‘श्रीनिवास’चा विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. संरक्षित वाघांचे मृत्यू असे बेवारस जनावरांच्या मृत्यूसारखे कसे होतात, असा प्रश्न यातून निर्माण होतो.

वाइल्डलाइफ कॉन्झरर्व्हेशन ट्रस्ट, मुंबई या संस्थेचे नागपूर येथील संवर्धन संशोधक आदित्य जोशी हे संवर्धन विषयात वन्यजीवन जीवशास्त्र्ााचे एनसीबीएस बंगळुरूचे स्नातकोत्तर पदवीधर आहेत. त्यांच्या मते जयला लावलेली कॉलर ही निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळेच एकापेक्षा अधिक वेळेस गुंगीचे औषध देऊन पुनः पुन्हा ‘जय’वर तो प्रयोग करावा लागला. सध्या केंद्र शासनाची ‘डब्ल्यूआयआय’ ही संस्था याकामी वन खात्यास सहाय्य करत आहे. ज्यावर शासन कोटय़वधी रुपये खर्च करते. वाघांवर या संस्थेमार्फत लक्ष ठेवले जाते. सध्या वाघांना दोन प्रकारे कॉलरिंग होते. एक व्हीएचएफ आणि दुसरे जीपीएसद्वारे वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. नुकत्याच मरण पावलेल्या ‘श्रीनिवास’ वाघाची कॉलर अगोदर लावली गेली तेव्हा वन खात्याला त्याच्या हालचालींबाबतीत माहिती होती, पण दुसऱयांदा जेव्हा पुन्हा कॉलर लावण्यात आली तेव्हा त्याची माहिती केवळ ‘डब्ल्यूआयआय’ संस्थेजवळ होती असे सांगण्यात येते. त्यामुळे डब्ल्यूआयआय या एकमेव संस्थेवरच शासनाने अवलंबून न राहता वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इतर संबंधित तज्ञ संस्थांचीही मदत घ्यायला हवी, असे या क्षेत्रातील वन्य जीवप्रेमींचे म्हणणे आहे.

एक ध्येय म्हणून गेली ४० वर्षे दिल्लीस्थित वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया संस्थेचे नागपूरस्थित प्रफुल्ल भांबूरकर यांच्या मते वाघांच्या हालचाली आणि संख्येवर लक्ष ठेवण्यात गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले आहेत. पग मार्क, कॅमेरा ट्रप, आणि आता कॉलर, पण कॉलरचा दर्जा अथवा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्यामुळे वारंवार त्या लावाव्या लागत आहेत. ‘जय’च्या बाबतीत हा प्रकार झाल्याचे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे त्याचा निश्चितपणे वाघांवर मानसिक परिणाम होतो. कारण वाघ हासुद्धा मानवाप्रमाणेच स्वातंत्र्य प्रिय असलेला प्राणी आहे. ‘श्रीनिवास’ या वाघाचा विजेच्या तारेचा धक्का लागून झालेला मृत्यू तर अधिक धक्कादायक आहे. कारण त्याचा मृत्यू विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श होऊन झाला. मुळात अशा प्रकारे विद्युत प्रवाह असलेली तार लावणे बेकायदेशीर आहे. त्याचा वापरच करायचा असेल तर सोलर प्रवाहाचे विद्युत कुंपण  लावायला हवे. उच्च प्रवाहाच्या विद्युत कुंपणाला बंदी आहे. तेव्हा निदान  भविष्यात तरी वन्य प्राण्यांच्या अशा मृत्यूंसाठी आणि त्यामुळे होणाऱया राष्ट्रीय हानीसाठी विद्युत मंडळलादेखील जबाबदार धरले पाहिजे. असे अनेक प्राणी याअगोदर मारले गेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी मानसिंगदेव येथील अभयारण्यात झालेल्या वाघिणीच्या मृत्यूचे उदाहरण ताजेच आहे. पावसाळ्यात तर विद्युत खांबावर झाडे पडून त्याखाली मृत होणाऱया प्राण्यांचे प्रकरण तेथेच दाबले जाते. त्याकरिता एकदाच खर्च करून खांबाची उंची वाढवायला हवी असे भांबूरकर म्हणतात.

महाराष्ट्र शासनाचे नागपूरचे मानद वन्य जीवरक्षक कुंदन हाते हे गेली अनेक वर्षे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील कार्यामुळे त्यांच्यावर वन खात्यातील ही महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांच्या मते जयला दोनवेळा कॉलर लावली गेली. दुसऱयांदा कॉलर लावण्यासाठी चार वेळा गुंगीचे औषध दिले गेले. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांची पूर्णतः दिशाभूल केली गेली आहे. त्यामुळेच शासनाला ‘जय’बाबत योग्य स्पष्टीकरण देता आलेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

वाघांच्या एकूण संख्येपैकी ७५ टक्के वाघ हे पर्यटन क्षेत्राच्या बाहेर आहेत. पण वन खात्याने ‘डब्ल्यूआयआय’ या संस्थेवर संवर्धनाची जबाबदारी टाकून स्वतःला पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवून घेतले आहे. त्यामुळे इतर वाघ आणि संवर्धन याकडे लक्ष देण्यास वन खात्यास वेळच नाही. कॉलरिंगसारख्या योजनासुद्धा  इतर संस्थांमार्फत राबविणे अयोग्य आहे असे हाते यांचे ठाम मत आहे.

नागपुरातील ‘सृष्टी’ ही वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून या क्षेत्रात त्यांचे बरेच योगदान राहिले आहे. त्यातील सक्रिय सदस्य आणि माजी सचिव उदयन पाटील यांनी व्याघ्रसंवर्धन आणि त्यातील अयोग्य नियोजनाची माहितीच उपलब्ध करून दिली. सप्टेंबर २०१५ मध्ये ‘जय’ला पहिल्यांदा ‘डब्ल्यूआयआय’ या संस्थेमार्फत कॉलर लावण्यात आली जी नोव्हेंबर २०१५ मध्ये अयशस्वी झाली. खरेतर ती तीन वर्षांपर्यंत चालायला हवी होती. मग पुन्हा मार्च २०१६ला कॉलर लावण्यात आली जी पुन्हा एप्रिल २०१६ ला बंद पडली. त्यामुळे ‘जय’च्या हालचालींचे संकेत येणे बंद झाले व पर्यटक आणि संस्था यांनी वांरवार चौकशी केल्यामुळे ‘डब्ल्यूआयआय’ आणि वन खात्याने कबूल केले की, कॉलर काम करत नसल्यामुळे ‘जय’बाबत माहिती उपलब्ध होऊ शकत नाही व ‘जय’ कदाचित इतर ठिकाणी गेला असावा असे वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला, पण जर जीपीएस प्रणाली प्रतिसाद देत नव्हती तर व्हीएचएफ याद्वारे ‘जय’चा ठावठिकाणा व शोध घेण्याचे कष्ट घेतले का नाहीत, हा सवाल अनुत्तरीत राहतो व संशयाला वाव मिळतो की ‘जय’ गुंगीच्या औषधाच्या अतिवापरामुळे मरण पावला असावा. कारण त्याची ‘श्रीनिवास’ या वाघासारखी कॉलरसुद्धा सापडली नाही ही वस्तुस्थिती आहे.

याचदरम्यान ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातील टी-८ या वाघाच्या बछडय़ाच्या अचानक मृत्यूचे कारण वाघांमध्ये झालेली लढाई हे सांगण्यात आले. पण जीपीएसच्या प्रणालीनुसार जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सहा दिवस तो बछडा जखमी अवस्थेत एकाच ठिकाणी पडून होता. म्हणजेच योग्य उपचाराअभावी कॉलर असूनही टी-८ या बछडय़ाचा मृत्यू झाला. यासाठी कोणाला जबाबदार धरायचे?

‘जय’ मृत झाला आहे याबाबत वन्यप्रेमी गेले वर्षभर धाडसाने चर्चा करत आहेत. याला धाडस यासाठी म्हणायचे कारण या चर्चेने शासनाला धडकी भरली आहे. एरव्ही वाघांचे बारसे करणारे वन खाते आज ‘जय’च्या बाबतीत मौन बाळगून आहे. वन्य संस्कृतीप्रमाणे ‘जय’च्या पिंडाला किती गिधाडं (हल्ली तेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत) शिवली हे सांगायला कोणी तयार नाही. कायद्याप्रमाणे माणूस जर काही वर्षे बेपत्ता राहिल्यास त्याला मृत घोषित करण्याची तरतूद आहे. त्याला प्राणी अपवाद आहेत. म्हणून इतकेच म्हणावेसे वाटते ‘जय दाखवा नाहीतर श्राद्ध करा.’

आपली प्रतिक्रिया द्या