कारागृह उपअधिक्षकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

495
प्रातिनिधिक छायाचित्र

ससून रुग्णालयात ड्युटी लावल्याच्या कारणातून कारागृहातील एका कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित कारागृह कर्मचाऱ्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.

जयकुमार सोमनाथ शिंदे (वय 39, रा. शासकीय कर्मचारी निवासस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर (वय 55, रा. शासकीय वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रमणी येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारागृहातील आरोपी प्रकाश फाले याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी जयकुमार शिंदेला ससून रुग्णालयात रात्रपाळी ड्युटीला जाण्याचे लेखी आदेश चंद्रमणी यांनी दिले होते. त्याचा राग आल्यामुळे जयकुमार चंद्रमणी यांना दररोज मला ससून रुग्णालयात जाण्यास सांगतोस, तुझा आदेश असला तरी मी ससून रुग्णालयात जाणार नाही असे म्हटले. यानंतर लेखी आदेश चंद्रमणीच्या अंगावर फेकून दिला. त्यामुळे चंद्रमणी यांनी त्याला वरिष्ठांना बोलण्याची अशी पद्धत आहे का? अशी विचारणा केली.

त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत मी ससून रुग्णालयात ड्युटीला जाणार नाही, मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर त्याला काही कमी जास्त झाले तर मी तुझ्या खानदानाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या