दारूची बाटली आणि पैशांसाठी हपापलेल्या तुरूंग अधीक्षकाला लाच घेताना अटक

सामना ऑनलाईन, जळगाव

दारूची बाटली आणि ५ हजार रूपयांच्या मोबदल्यात कैद्यांना जिल्हा रूग्णालयात पाठवण्यासाठी परवानगी देणाऱ्या लाचखोर तुरूंग अधीक्षक दिलीपसिंह डाबेराव यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी सकाळी ८ वाजता अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक पराग सोनावणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब ही आहे की जळगांवचा तुरूंग हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्याच आवारात आहे. अत्यंत वर्दळीच्या या परीसरात तुरुंग अधीक्षक बिनधास्त लाच घेत असल्याने या अधिकाऱ्यांना आजपर्यंत कोणाचाही वचक नव्हता हे सिद्ध झालं आहे.

पैशाच्या जोरावर कैद्यांना विविध सुविधा मिळत असल्याच्या अनेकदा बातम्या वाचनात आल्या आहेत, अनेकदा या लाचखोरीचं वृत्तवाहीन्यांनी स्टींग ऑपरेशन देखील केलेलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईनंतर तुरूंगातील लाचखोरीचं रेटकार्डचं उघड झालं. कैद्याला जिल्हा रूग्णालयात पाठवायची परवानगी द्यायची असेल तर दारूची बाटली आणि ५ हजार रूपये असा दर आहे. असे दिवसभरात किमान ४ कैदी जिल्हा रूग्णालयात पाठवले जात होते. म्हणजे दिवसभरात २० हजार रूपये लाच आणि ४ दारूच्या बाटल्या लाचखोर अधिकारी जमा करत होते.

एका कैद्याला पहाटे रुग्णालयात पाठवण्याची परवानगी देण्यासाठी डाबेराव यांनी लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेण्यासाठी डाबेराव यांनी कैद्याच्या नातेवाईकांना बंगल्यावर बोलावलं होतं. लाचेच्या रकमेतील २ हजार रूपये स्वीकारताना डाबेराव यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. डाबेराव यांच्यासह पोलीस हवालदार बाबू आमले यांना देखील अटक करण्यात आली आहे.